India suspended Indus Water Treaty tension rises in Pakistan : भारताने सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पाकिस्तानमधील बहुसंख्य जनता, तिथली शेती व उद्योगधंदे हे प्रामुख्याने सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे तिथल्या सरकारला आणि जनतेला चिंता वाटणं सहाजिक आहे. दरम्यान, हीच चिंता तिथले विरोधी पक्ष जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी यावरून भारताचं रक्त सांडू अशी धमकी दिली आहे. मात्र, आता त्यांच्या पक्षाचा सूर बदलला आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-एन-इन्साफ पक्षाचे खासदार सैय्यद अली जफर यांनी सरकारला आरसा दाखवला आहे. जफर यांनी भारताच्या कृतीचा ‘वॉटर बॉम्ब’ असा उल्लेख केला आहे.

पाकिस्तानच्या संसदेत शुक्रवारी (२३ मे) भारताने सिंधू जलकरार स्थगित केल्याच्या मुद्द्यावर बराच वेळ चर्चा झाली. यावेळी खासदार सैय्यद अली जफर यांनी त्यांच्या भाषणात पाकिस्तानचा पाणी प्रश्न मांडला. ते म्हणाले, “हे युद्ध आपल्यावर लादलं गेलं आहे. पाण्याच्या प्रश्नावर २१ व्या शतकात युद्धे होतील असं म्हटलं जायचं ते आता खरं ठरू लागलं आहे”.

पाण्याचा प्रश्न दहशतवादाइतकाच महत्त्वाचा : सैय्यद अली जफर

सैय्यद अली जफर म्हणाले, “पाकिस्तानमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. अनेक जिल्हे दुष्काळाशी सामना करत आहेत. देश मोठ्या वेगाने पाणीचंटाईकडे वाटचाल करत आहे. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे हवामान बदल आणि दुसरं कारण म्हणजे लोकसंख्येचे विस्फोट. हा प्रश्न दहशतवादाइतकाच गंभीर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून

जफर म्हणाले, “सरकारने पाणी प्रश्न मिटवला नाही तर आपण पाण्यावाचून, उपाशी मरू शकतो. सिंधू नदी ही आपली जीवनवाहिनी आहे. आपल्या देशात उपलब्ध असलेलं तीन चतुर्थांश पाणी बाहेरून येतं. देशातील १० पैकी ९ लोक सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ९० टक्के शेती सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानमधील प्रमुख जलविद्युत प्रकल्प, धरणं याच नदीवर आहेत. मात्र, आता आपल्यावर वॉटर बॉम्ब पडला आहे जो आपल्याला डिफ्यूज करावा लागेल”.