नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरोधात निर्बंध कठोर केले आहेत. त्यानुसार, पाकिस्तानातून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानकडून हवाई किंवा अन्य मार्गाने होणारी टपालसेवा बंद केली गेली आहे.
या उपायांच्या जोडीला पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे. भारतीय जहाजांनाही पाकिस्तानला जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे असे शिपिंग महासंचालनालयाने (डीजीएस) जाहीर केले. भारतीय मालमत्ता, मालवाहू जहाजे आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा विचारात घेऊन हे आदेश जारी करण्यात आल्याचे ‘डीजीएस’च्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
भारताने पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवर घातलेली बंदी तत्काळ लागू करण्यात येत असल्याचे सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासंबंधीची अधिसूचना २ मे रोजी काढण्यात आली. यापूर्वी २०१९मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी वस्तूंवर २०० टक्के आयातशुल्क लागू केले होते. त्यामुळे थेट बंदी न घालताही पाकिस्तानी वस्तूंची आयात थांबली होती. मात्र, आता घेतलेल्या निर्णयानुसार, तिसऱ्या देशांच्या मार्गानेही पाकिस्तानी वस्तूंच्या भारतात प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) शुक्रवारच्या आदेशात नमूद केले आहे की, ‘‘पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानात उत्पन्न होणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतुकीवर बंदी घालण्यात येत असल्याची तरतूद परदेश व्यापार धोरण (एफटीपी) २०२३मध्ये जोडण्यात आली आहे.’’ या निर्बंधांमध्ये कोणताही अपवाद करावयाचा असल्यास त्यासाठी भारत सरकारच्या परवानगीची गरज असेल. यामुळे पाकिस्तानकडून थेट किंवा अन्य कोणत्याही व्यापार मार्गाने होणाऱ्या आयातीवर निर्बंध घातले जातील असे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत भारताने पाकिस्तानला ४४.७६ कोटी डॉलर इतक्या मूल्याच्या वस्तू निर्यात केल्या होत्या. तर याच कालावधीत पाकिस्तानकडून केलेल्या आयातीचे मूल्य केवळ ४२ लाख डॉलर इतके होते. या आयात वस्तूंमध्ये अंजीर, बेसिल आणि रोझमेरी वनस्पती, विशिष्ट रसायने आणि हिमालयातील गुलाबी मीठ यांचा समावेश होता.
‘दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाईसाठी कटिबद्ध’
●पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाईचा पुनरुच्चार केला. दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
●अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मैनुअल गोंकाल्वेस भारताच्या चार दिवसीय भेटीवर आले आहेत. नवी दिल्लीत त्यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधातील कारवाईचा निर्धार स्पष्ट केला.
ओमर अब्दुल्लांची पंतप्रधानांशी चर्चा
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थांनी सुमारे ३० मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबाबत यावेळी आढावा घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.