भाजपासोबत युती तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी बुधवारी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश यांच्या संयुक्त जनता दलाने काँग्रेस, डावे पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेऊन राज्यात नव्या महागठबंधन सरकारची स्थापना केली. या संपूर्ण राजकीय उलथापालथीनंतर नितीश बिहारच्या मुख्यमंत्रीपदी जरी कायम राहिले असले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये मात्र प्रचंड घट झाली आहे. ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी व्होटर’च्या संयुक्त सर्वेक्षणात नव्या आघाडीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे आरजेडीचे तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.  

नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी बिहारमधील महागठबंधन प्रयोग ‘राष्ट्रीय मॉडेल’ ठरणार?

या संयुक्त सर्वेक्षणात बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमारांसह भाजपाच्या इतर नेत्यांना मागे टाकत तेजस्वी यादव या सर्वेक्षणात पहिल्या क्रमाकांवर आहेत. ‘सी व्होटर’च्या सर्वेक्षणात ४३ टक्के लोकांनी बिहारचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना बघायला आवडेल, असे म्हटले आहे. तर केवळ २४ टक्के लोकांनीच नितीश कुमारांना पहिल्या पसंतीचे मतदान केले आहे. १९ टक्के लोकांनी भाजपा नेत्याला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दर्शवली आहे. सर्वेक्षणानुसार तेजस्वी यादव यांच्या लोकप्रियतेमध्ये झालेली वाढ आगामी निवडणुकीत नितीश कुमारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

महिला मतदारांसाठी पहिल्या पसंतीचा मुख्यमंत्री कोण?

महिला मतदारांनीही या सर्वेक्षणात तेजस्वी यादव यांनाच मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती दर्शवली आहे. ४४ टक्के महिला तेजस्वी यादव यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास उत्सूक आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमारांना केवळ २३.३ टक्के महिलांनीच पसंती दर्शवली आहे. या सर्वेक्षणातही भाजपा तिसऱ्या स्थानी असून १७.५ टक्के महिलांनी भाजपाला कौल दिला आहे. २०२० मध्ये पाठिंबा देणाऱ्या महिलांमध्येही यंदा नितीश कुमारांच्या लोकप्रियतेत घट झाली आहे.

दरम्यान, या सर्वेक्षणात ४१.८ टक्के पुरुषांनी तेजस्वी यादव यांनाच पहिली पसंती दर्शवली आहे. तर २३.८ टक्क्यांसह नितीश दुसऱ्या तर १९.६ टक्के मतांसह भाजपा नेते या शर्यतीत तिसऱ्या स्थानी आहेत. आरजेडी नेत्याची लोकप्रियता सर्वच स्तरांमध्ये वाढलेली दिसत आहे.

विश्लेषण : सत्तासमीकरण कोणतंही असो, केंद्रस्थानी नितीश कुमारच; ‘हे’ तीन घटक ठरतायत कारणीभूत!

ओबीसी, मुस्लीम समाजाचा कौल कुणाला?

जातीच्या आधारे लोकप्रियता बघायला गेल्यास तेजस्वी यादव हेच पहिल्या स्थानी कायम आहेत. ओबीसी समाजातील ४४.६ टक्के लोक तेजस्वी यादव यांच्या बाजूने आहेत. तर २४.७ टक्के लोकांनी पुन्हा नितीश यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी कौल दिला आहे. भाजपा नेत्याला केवळ १२.४ टक्के लोकांनीच या सर्वेक्षणात मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

भावी मुख्यमंत्रीपदासाठी मुस्लीम समाजानेही तेजस्वी यादव यांची उघडपणे बाजू घेतली आहे. ५४ टक्के मुस्लीम समाज नितीश कुमारांपेक्षा तेजस्वी यादव यांनाच उत्तम मुख्यमंत्री मानत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ३० टक्के मतांसह नितीश दुसऱ्या तर केवळ ३.३ टक्केच मुस्लीम समाजातील लोकांनी भाजपाला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी योग्य समजले आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४मध्ये जिंकले खरे, पण २०२४मध्ये…”, शपथविधीनंतर नितीश कुमार यांचा खोचक टोला!

निवडणुका झाल्यास वरचढ कोण ठरणार?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारी जनतेने एनडीए(NDA) आघाडीला भरघोस ५४ टक्के मतदान केले होते. मात्र, आता ऑगस्ट २०२२ पर्यंत ही टक्केवारी घटून ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या ३ वर्षात एनडीएची लोकप्रियता तब्बल १३ टक्क्यांनी घटली आहे. तर दुसरीकडे एनडीएच्या या घसरणीचा फायदा महागठबंधनला झाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३१ टक्क्यांसह पिछाडीवर असणाऱ्या महागठबंधनने ४६ टक्क्यांपर्यंत झेप घेतली आहे. मतांची ही टक्केवारी पाहता आगामी निवडणुकीत एनडीएला १४ टक्के मतांचा  फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत ३९ जागा जिंकणाऱ्या एनडीएसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. तर नितीश यांनी आरजेडी आणि काँग्रेसशी केलेली हातमिळवणी भविष्यात महागठबंधनला फायद्याची ठरु शकते असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे