India US Trade Deal : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावत जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादलं. भारतावरही एकूण ५० टक्के आयातशुल्क लादलेलं आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी ५० टक्के टॅरिफ भरावा लागत आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे.

एवढ्यावरच न थांबता ट्रम्प यांनी भारताला अनेकदा डिवचण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. मात्र, भारताने अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला जुमानलं नाही. यानंतर अखेर डोनाल्ड ट्रम्प हे नरमल्याचं पाहायला मिळत आहे. आता लवकरच भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेलं ५० टक्के आयातशुल्क अमेरिका कमी करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या संदर्भातील वृत्त मिंटच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सन दिलं आहे.

वृत्तानुसार, भारत आणि अमेरिका आयातीवरील शुल्क १५ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी व्यापार कराराच्या जवळ पोहोचले आहेत अशी माहिती समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार रखडला आहे. मात्र, दीर्घकाळापासून रखडलेला हा व्यापर करार आता लवकरच पूर्ण होणार असून त्या करारामुळे भारतीय आयातीवरील अमेरिकन शुल्क ५० टक्क्यांवरून १५ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, ऊर्जा आणि शेतीवर अवलंबून असलेल्या या करारामुळे भारत हळूहळू रशियन कच्च्या तेलाची आयात कमी करू शकतो, असंही या अहवालात म्हटलं आहे. मात्र, यावर अद्याप भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

ट्रम्प यांनी नुकतंच म्हटलं की, ‘त्यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. ही चर्चा मुख्यत्वे व्यापारावर केंद्रित होती. ऊर्जा देखील त्यांच्या चर्चेचा एक भाग होती. यावेळी मोदींनी त्यांना आश्वासन दिलं की भारत रशियाकडून तेल खरेदी मर्यादित करेल’, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या रशिया भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ३४ टक्के पुरवठा करतो, तर देशाच्या तेल आणि वायूच्या गरजांपैकी सुमारे १० टक्के (मूल्यानुसार) अमेरिकेतून येतो.

ऊर्जेच्या बाबतीत भारत हळूहळू रशियन तेलावरील अवलंबित्व कमी करू शकतो आणि अमेरिकेतून इथेनॉल आयात करण्यास परवानगी देऊ शकतो. त्याऐवजी वॉशिंग्टन ऊर्जा व्यापारावर सवलती देऊ शकेल अशी अपेक्षा आहे. या व्यापार करारावर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीदरम्यान आसियान शिखर परिषदेत द्विपक्षीय व्यापार कराराची अंतिम करण्याची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.