आजवर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानलाच आता दहशतवादाचा फटका बसू लागला आहे. अंतर्गत सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानकडून आता याचे खापर इतरांवर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतः अपयशी ठरल्यानंतर आता पाकिस्तानच्या लष्कराने भारतावर खोटे आरोप लावण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. नुकतेच तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताचा दौरा केला. भारत-अफगाण यांच्या संबंधात सुधारणा होत असतानाच पाकिस्तानी लष्कराने आरोप केले आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पेशावर येथे नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत त्यांनी पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा (KP) येथील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केला.

काबूलमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या छावण्यांवर पाकिस्तानने हवाई हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. हा तणाव वाढला असताना पाकिस्तानने भारतावर दोषारोप केले आहेत. विशेष म्हणजे, तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचा भारत दौरा होत असताना पाकिस्तानकडून हा कथित हल्ला करण्यात आला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात जवळीक वाढत असल्याचे दिसताच पाकिस्तानला धक्का बसल्याचे दिसून येते.

पेशावर येथील पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी खैबर पख्तूनख्वा येथील वाढत्या हल्ल्यांची कारणीमीमांसा सांगितली. राष्ट्रीय कृती योजनेची (NAP) अंमलबजावणी न करणे आणि राजकीय दहशतवादामुळे हल्ले वाढल्याचे ते म्हणाले. तसेच पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी भारताकडून अफगाणिस्तानचा वापर होत असल्याचा दावाही चौधरी यांच्याकडून करण्यात आला.

अमीर खान मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानातील कारवायांबद्दल पाकिस्तानला कठोर इशारा दिला. (Photo: AP)

लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी पुढे म्हटले की, २०२१ मध्ये अमेरिकेन सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर त्यांनी मागे सोडलेल्या शस्त्रांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत आहे. आमची एकच मागणी आहे की, तुमच्या भूमीचा (अफगाणिस्तान) वापर दहशतवादी कृत्यांसाठी करू देऊ नका. तसेच सौदी अरेबिया, यूएई, चीन, अमेरिका आणि तुर्कीयेच्या सहकार्याने पाकिस्तान अफगाणिस्तानमधील यंत्रणांशी थेट चर्चा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.