भारताचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवण्याची इच्छा आहे, मात्र ‘दहशतवादाची आयात’ हा एक मोठा मुद्दा असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

आमचा हेतू पाकिस्तानसोबत नेहमी चांगले संबंध ठेवण्याचाच राहिला आहे. आमच्या बाजूने आम्हाला काहीच अडचण नाही, तथापि दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांची आयात हा त्यामागे एक मोठा मुद्दा आहे, असे भारत-पाकिस्तान संबंधांबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात नितीन गडकरी म्हणाले.

इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे  आयोजित करण्यात आलेल्या संवादात्मक कार्यक्रमात त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, अमेरिकेच्या आठवडाभराच्या दौऱ्यावर आलेल्या गडकरी यांनी याहून अधिक काही बोलण्यास नकार दिला.

इराणमधील चाबहार बंदर येत्या १८ महिन्यांच्या आत बांधून पूर्ण करण्याची भारताला अपेक्षा आहे. या बंदरामुळे भारताला पाकिस्तानचा मार्ग टाळून थेट अफगाणिस्तान व रशियाला पोहोचणे शक्य होईल. या बंदरामुळे भारतीय उद्योजकांसाठी नव्या संधीचे द्वार खुले होईल, असेही गडकरी म्हणाले.