मुंबईत २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसरा हल्ला झाल्यास भारत संयम बाळगणार नाही, असा स्पष्ट इशारा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमेरिकेला २००९ मध्ये दिला होता. क्लिटंन या त्या वेळी परराष्ट्रमंत्री होत्या. त्यांनी लिहिलेल्या ‘हार्ड चॉइसेस’ या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानने २६/११/२००८ रोजी जो हल्ला केला होता त्यानंतर भारताने हा इशारा दिला होता. हिलरी यांची त्या वेळी मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली होती.
पुन्हा असा हल्ला झाल्यास आम्हाला संयम पाळणे कठीण असल्याचे सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केले होते. पाकिस्तानच्या लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने २००८ मध्ये मुंबईत अनेक ठिकाणी सुसंघटित हल्ले केले होते. त्यात पाच अमेरिकी लोकांसह १६६ जण ठार झाले होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेला तो हल्ला अमेरिकेत ९/११ रोजी झालेल्या हल्ल्यासारखाच होता, असे भारताने त्या वेळी म्हटले होते.
जेथे हल्ला झाला त्या मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये आम्हीही राहिलो. क्लिंटन या २००९ रोजी भारतात आल्या होत्या. त्यांनी सांगितले, की ताज महाल हॉटेलमध्ये राहून आपण स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली. मुंबई घाबरलेली नाही व येथील व्यापार चालूच राहतील, असा संदेश देण्याचा उद्देश त्यामागे होता, असे त्या म्हणाल्या.
क्लिंटन यांचे हे पुस्तक ६०० पानांपेक्षा मोठे असून त्या म्हणतात, की आशिया-प्रशांत धोरणात भारत हा अमेरिकेतील ओबामा प्रशासनाचा मोठा भागीदार आहे. भारताला आशियाई-प्रशांत क्षेत्राच्या राजकीय परिप्रेक्ष्यावर आणणे हाही आमच्या धोरणाचा हेतू आहे. जगातील मोठा लोकशाही देश म्हणून भारताला पाठिंबा देणे किंबहुना राजकीय व आर्थिक खुलेपणा राखणाऱ्या देशांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे होते. चीनप्रमाणे एकाधिकारशाही प्रकारातील सरकारी भांडवलशाहीला अनुसरणे शहाणपणाचे नव्हते, असे त्या म्हणतात.
क्लिंटन यांचा दुसरा भारत दौरा परराष्ट्रमंत्री म्हणून जुलै २०११ मध्ये झाला त्या वेळी त्या चेन्नईला गेल्या होत्या. अमेरिकेच्या कुठल्याही परराष्ट्रमंत्र्याने चेन्नईला भेट दिली नाही, पण दिल्ली व मुंबईपेक्षा भारतात इतरही शहरे माहीत करून घेण्याची आमची इच्छा त्यातून आम्ही दाखवून दिली, असे त्या नमूद करतात.
अमेरिकेचे भारताशी असलेले संबंध हे लोकशाही मूल्ये, आर्थिक प्रोत्साहन व राजनैतिक अग्रक्रम यांच्यावर आधारित आहेत. दोन्ही देशांतील संबंधांच्या परिपक्व टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत, असे त्या म्हणतात. १९९५ मध्ये हिलरी क्लिंटन यांनी भारताला त्यांची कन्या चेलसा हिच्यासमवेत भेट दिली होती. त्याचीही आठवण या पुस्तकात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India was ready to hit pak reveals clinton
First published on: 12-06-2014 at 04:05 IST