भारताने जैश ए महंमदचा दहशतवादी व पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझर याच्यावर संयुक्त राष्ट्रांनी कारवाई करून र्निबध घालावेत अशी मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने र्निबधाच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश केला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूत सय्यद अकबरूद्दीन यांनी न्यूझीलंडचे राजदूत व सुरक्षा मंडळाच्या अल कायदा र्निबध समितीचे अध्यक्ष जॅकोबस व्हॅन बोहेमन यांना पत्र पाठवले असून त्यात भारताने जैश ए महंमदचा प्रमुख असलेल्या अझरला र्निबधांच्या यादीत समाविष्ट करावे असे म्हटले आहे. मौलाना मासूद अझर पठाणकोट हल्ल्यात सामील असल्याचे अनेक पुरावे मिळाले असून २ जानेवारीला पठाणकोट येथे हल्ला झाला होता त्यात सात भारतीय जवान हुतात्मा झाले होते. अझरला र्निबध यादीत टाकले नाही तर त्याचे दक्षिण आशियातील दहशतावादी कारवाया वाढण्यात परिणाम होऊ शकतात, असे भारताने म्हटले आहे. अल कायदा र्निबध समिती अंतर्गत अझरवर कारवाई करावी असे भारताचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांचे जैश ए महंमद व इतर दहशतवादी गटांच्या कारवायांपासून रक्षण करणे हे सुरक्षा मंडळाचे कर्तव्य आहे असेही भारताने सांगितले. अझरला र्निबध यादीत टाकले तर दहशतवादाचा मुकाबला करणे सोपे होणार आहे व त्या संघटनेचा अर्थपुरवठाही थांबवला जाईल. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, जैश ए महंमद संघटनेचा समावेश र्निबधांच्या यादीत आहे पण या संघटनेचा म्होरक्या मौलाना मासूद अझर यांचे नाव त्यात नाही. संयुक्त राष्ट्रांनी २००१ मध्ये जैश ए महंमद या संघटनेवर मुंबई हल्ल्यानंतर बंदी घातली आहे. अझरवर बंदी घालण्याचे भारताचे प्रयत्न चीनने पाकिस्तानच्या सांगण्यावरून नकाराधिकार वापरत यशस्वी होऊ दिले नाहीत. भारतातील दहशतवादाशी संबंधित ११ व्यक्ती व एक संघटना यांची यादी संयुक्त राष्ट्रांना १८ फेब्रुवारीला सादर केली असून त्यात त्यांच्यावर र्निबधांची मागणी केली आहे.