India Pakistan War Tensions : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने आज (७ मे) मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यादरम्यान भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या दहशतवादी तळांवर अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामध्ये २००८ मध्ये मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेलं तळही भारतीय लष्कराने आज उद्ध्वस्त केलं. याबाबत भारतीय लष्कराने आज संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी आज पत्रकार परिषदेत भारताची हवाई हल्ल्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जिथे जिथे हल्ला घडवून आणला तेथील व्हिडिओही फुटेजही जारी केले आहेत. सवाईनाला ते भागलपूरपर्यंतच्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. यावेळी त्यांनी या हल्ल्यात सामान्य नागरिकांना आणि निवासी भागांचं नुकसान न झाल्याचंही स्पष्ट केलं. तसंच, सीमारेषेपासून हल्ल्याचे ठिकाण किती लांब आहे याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

त्याचप्रमाणे मरकझ तैयबा मुरीदके या तळाविषयी माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय सीमेपासून १८ ते २५ किमी लांब असलेल्या या दहशतवादी तळावर हल्ला करण्यात आला. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी इथेच प्रशिक्षित झाले. अजमल कसाब आणि डेविड हेडली यांनाही येथेच प्रशिक्षण मिळालं होतं.”

आणखी कुठे झाला हल्ला?

सवाईनाला कॅम्प मुझफ्फराबाद हा तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. इथूनच काही हल्ल्यांमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळालं होतं. येथे सर्वांत आधी हल्ला झाला.

सय्यदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद हा जैश ए मोहम्मदचा तळ आहे. इथे दहशतवादी हत्यारं आणि दारूगोळा ठेवत होते.

गुलपूर कॅम्प, कोटली – हा LOC पासून ३० किलोमीटर दूर होता. लष्कर ए तय्यबाचा कॅम्प होता. राजौरी आणि पूंछमध्ये या कॅम्पमधून प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांकडून कारवाया करण्यात आल्या होत्या.

बरनाला कॅम्प, भिमबर – हा एलओसीपासून ९ किमी लांब आहे. इथे हत्यार, आयईडी यांचं प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिलं जात होतं.

अब्बास कॅम्प, कोटली – हा एलओसीपासून १३ किमी लांब आहे. लष्कर ए तय्यबाचा फिदायीन इथे तयार होत होता. १५ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची या कॅम्पची क्षमता होती.

पाकिस्तानच्या हद्दीतील टार्गेट

सर्जल कॅम्प, सियालकोट – हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे.

मेहमुला जाया कॅम्प, सियालकोट – हा १८ ते १२ कमी आंतरराष्ट्रीय सीमेपासून लांब होता. हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता. कठवा जम्मूमध्ये दहशत पसरवण्यासाठीचं केंद्र होतं. पठाणकोट एअर बेसवर झालेला हल्ला याच कॅम्पमध्ये आखण्यात आला होता.

मरकझ सुभानअल्लाह, भागलपूर – हा तळ आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १०० किमी लांब आहे. हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं. इथे रिक्रुटमेंट, प्रशिक्षण दिलं जात होतं. दहशतवाद्यांचे महत्त्वाचे नेते इथे येत होते.