साडेदहा हजार कोटींचा काळा पैसा भारतात आणण्यात यश
‘‘आम्ही १७ महिन्यांपूर्वी केंद्रस्थानी सत्तेत आलो. त्या वेळची देशाची आर्थिक परिस्थिती आणि आताची स्थिती यात प्रचंड फरक पडला असून अर्थव्यवस्थेची सर्व स्तरांत प्रगती झाली आहे. परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. तसेच परदेशातून साडेदहा हजार कोटी रुपयांचा काळा पैसा मायदेशी आणण्यात आम्हाला यश आले आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू झाल्याचे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.
भारत तसेच देशविदेशातील अर्थतज्ज्ञांची उपस्थिती असलेल्या सहाव्या दिल्ली आर्थिक परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री जयंत सिन्हा, सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन आदी या वेळी मंचावर होते.
आर्थिक सुधारणांबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचत पंतप्रधानांनी या वेळी पारंपरिक उपायांपल्याड विचार करण्याची गरज मांडली. आर्थिक सुधारणांच्या कल्पनांना मर्यादा असता कामा नये; तसेच त्यांच्या सर्वव्यापी अंमलबजावणीसाठी सामान्य जनता हा अंतिम धागा लक्षात घ्यावा, असेही ते म्हणाले. १०,५०० कोटी रुपयांचा काळा पैसा भारतात आणण्यासाठी सरकारच्या आर्थिक सुधारणांमधील पुढाकारच कामी आल्याचेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले..
* आम्हाला सत्तेत येऊन १७ महिने झाल्यानंतर देशाच्या विकास दरात वाढ झाली. महागाई कमी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे
* देशातील विदेशी गुंतवणूकही वाढली असून चालू खात्यावरील तूटही कमी होत आहे कर्जाचे व्याजदर कमी होत आहेत आणि महसुलातही वाढ नोंदली जात आहे
* डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर आहे आणि वित्तीय तूटही खाली आली आहे. सरकारने राबविलेल्या धोरणांचाच हा परिपाक आहे.

अर्थव्यवस्थेच्या विकासाला अडथळे ठरणाऱ्या समस्यांवर पारंपरिक पद्धतीने विचार न करता काही वेगळा तोडगा काढता येतो का, याचा विचार करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी उपस्थितांना केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या आर्थिक सुधारणा या सर्वसमावेशक असाव्यात. आर्थिक सुधारणांचे ध्येय हे केवळ प्रसारमाध्यमांचे मथळे झळकविणे नसून सामान्यांचे जीवनमान उंचावणारे असावे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान