नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन केंद्रीय मंत्री आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी भारतीय अर्थव्यवस्थेनेकथित चार हजार अब्जांचा (चार ट्रिलियन) टप्पा ओलांडल्याबद्दल सरकारची प्रशंसा केली. परंतु हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन करण्यात आलेले नाही.

अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाने (जीडीपी) चार हजार अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडल्याबद्दल समाजमाध्यमांवर प्रसृत झालेल्या माहितीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. समाजमाध्यमांवर वेगाने पसरत असलेले हे वृत्त चुकीचे असून, भारत अजूनही ‘चार ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेच्या टप्प्यापासून दूर आहे, असे उच्चपदस्थ सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.  

हेही वाचा >>> भारताशी केलेल्या करारांचा मालदिवकडून आढावा; नवे अध्यक्ष मोहमद मुइझ्झू यांची भूमिका

यासंदर्भात ‘एक्स’वर संदेश प्रसारित करणाऱ्यांत जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांचा समावेश आहे.  तर प्रसिद्ध उद्योगपती अदानी यांनी, ‘‘भारताचे अभिनंदन. चार हजार ४०० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेला जपान आणि चार हजार ३०० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीस मागे टाकून, जीडीपीत भारत तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होण्यासाठी आता फक्त दोन वर्षे उरली आहेत,’’ असा संदेश प्रसारित केला आहे. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘‘जीडीपीने ‘चार ट्रिलियन’चा टप्पा ओलांडल्याचा क्षण जागतिक स्तरावरील सन्मानाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नव्या भारताचा उदय अतुलनीय आहे,’’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमांवर चर्चा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कथित आकडेवारीवर आधारित सर्व देशांच्या नव्या ‘जीडीपी’च्या आकडेवारीचा अनधिकृत ‘स्क्रीनशॉट’ समाजमाध्यमांवर प्रसृत झाला आहे. तो प्रसृत करण्यात सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेकांचा समावेश आहे. फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी समाजमाध्यमांवर भारताच्या या कामगिरीची प्रशंसा केली.