Iran Missile Attack on US base in Qatar : इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यापासून या युद्धाची व्याप्ती वाढली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर आता इराणनेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने शक्तिशाली क्षेपणास्त्रे डागून अमेरिकेला इशारा दिला आहे. इराणच्या हल्ल्यामुळे कतारमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कतारच्या दोहा येथे वास्तव्यास असलेल्या एका भारतीय नागरिकाने कतारमधील हल्ल्यांचं चित्तथरारक वर्णन केलं आहे.

दोहामधील बिन महमूद येथील एका ३६ वर्षीय रहिवाशाने राजधानी दोहा शहराच्या नैऋत्येला असलेल्या अल उदेद या अमेरिकन हवाई दलाच्या तळावरील क्षेपणास्र हल्ल्याचं वर्णन केलं आहे. त्याने रात्री उशिरा दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की “आधी स्फोटाचा आवाज आला आणि अचानक आमच्या घराला हादरा बसला. सलग पाच स्फोटांचे आवाज झाले. त्यानंतर आमच्या घराच्या खिडक्या हादरल्या. मला इतक्या वर्षांत पहिल्यांदाच दोहामध्ये असुरक्षित वाटलंय. १० वर्षांमधली ही पहिलीच वेळ आहे”.

“लोकांमध्ये भीती पसरली आहे”

आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर या भारतीय रहिवाशाने सांगितलं की “आमच्या घरापासून जवळच स्फोट झाला. बाजूच्या परिसरातील लोक तिथे येऊन ढिगाऱ्यांकडे पाहत होते. त्यांना असं वाटत होतं की ते क्षेपणास्त्रांचे तुकडे आहेत. लोक आसपास पडलेल्या तुकड्यांचे व्हिडीओ चित्रित करत होते. ते दृष्य खूप भयानक होतं. आम्ही ते क्षेपणास्त्रांच्या तुकड्यांचे फोटो, व्हिडीओ केरळमधील आमच्या कुटुंबियांना पाठवले. त्यांना देखील भीती वाटत आहे”.

“लोक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवत आहेत”

दुसऱ्या एका रहिवाशाने सांगितलं की “इराण-इस्रायलमधील वाद शिगेला पोहोचल्यापासून आम्ही व आमच्या आसपासचे लोक जीवनावश्यक वस्तू साठवून ठेवत आहोत. जणू काहीतरी अनुचित घडणार आहे असं त्यांना वाटतंय. गेल्या काही दिवसांपासून दोहामधील सुपरमार्केट्समध्ये लोकांच्या रांगा लागत आहेत”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोहामधील दूतावासाकडून भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन

कतारमध्ये आठ लाखांहून अधिक भारतीय राहतात आणि काम करतात. दरम्यान, दोहामधील भारतीय दूतावासाने म्हटलं आहे की “सध्याची परिस्थिती पाहून आम्ही कतारमधील भारतीय समुदायाला सावधगिरी बाळगण्याचं, घरातच राहण्याचं व आसपास घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवा. स्थानिक बातम्या, सरकारच्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. भारतीय दूतावास तुम्हाला समाजमाध्यमांद्वारे माहिती देत राहील.