पहलगाम येथे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यापासून सीमेवर मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला. २२ एप्रिलपासूनच पाकिस्तानवर कारवाईची मागणी होऊ लागली. ७ मे रोजी मध्यरात्री भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीत एअर स्ट्राईक करत मोठी कारवाई केली. त्यापाठोपाठ दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करण्याचं सत्र सुरू झालं. भारतानं पाकिस्तानी ड्रोनचे हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून भारताचं नुकसान केल्याचे अनेक दावे करण्यात आले होते.

भारत व पाकिस्तानदरम्यान शनिवारी १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रविराम लागू करण्यावर सहमती दर्शवण्यात आली. त्यामुळे सीमेवरील सर्व प्रकारच्या कारवाया दोन्ही बाजूंनी थांबवण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी होणार्‍या कारवाया थांबल्यामुळे सीमेवरील तणावपूर्ण वातावरण काहीसं निवळल्याचं चित्र निर्माण झालं. यानंतर भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेऊन शस्त्रविरामाची माहिती देतानाच पाकिस्ताननं केलेल्या अनेक खोट्या दाव्यांचा बुरखा फाडला.

कमांडर रवी नायरदेखील पत्रकार परिषदेला हजर

या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासोबत कमांडर रवी नायरदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या निवेदनातून पाकिस्तानला सज्जड दम दिला. “आम्ही आज झालेल्या शस्त्रविरामाचं पालन करू. पण आम्ही पूर्णपणे सज्ज राहू. कायम सतर्क असू. भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आत्तापर्यंत पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारच्या आततायी कारवाईवर पूर्ण ताकदीनं भारतानं उत्तर दिलं आहे. यापुढेही जर असं काही पाऊल पाकिस्ताननं उचललं तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय लष्करानं खोडले पाकिस्तानचे दावे

दरम्यान, या पत्रकार परिषदेच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्ताननं गेल्या दोन दिवसांत केलेले अनेक दावे खोडून काढले. शिवाय, यासाठी १० मे रोजी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुरावेदेखील सादर केले होते. कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानने केलेल्या चार दाव्यांचा समाचार घेतला.

पहिला दावा – पाकिस्ताननं दावा केला होता की त्यांच्या लष्करानं जीएफ १७ या फायटर जेटच्या मदतीने भारताची एस ४०० सुदर्शन ही एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. पण हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं सोफिया कुरेशी म्हणाल्या. तसेच, पाकिस्ताननं भारताचं ब्रह्मोस मिसाईल देखील पाडल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता. हा दावाही पूर्णपणे खोटा असल्याचं कर्नल कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं.

दुसरा दावा – पाकिस्तानने दावा केला होता की त्यांच्या लष्करानं भारताच्या सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नलिया आणि भुज या ठिकाणच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ले चढवले आणि या तळांचं नुकसान केलं. पण या तळांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नसून पाकिस्तानचे हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावल्याचं कुरेशी म्हणाल्या. तसेच, पुराव्यादाखल या तळांवरचे आजचे फोटोदेखील सकाळच्या पत्रकार परिषदेत आपण सादर केल्याचं त्यांनी सांगितलं.

तिसरा दावा – चंदीगड व बियास या ठिकाणी असणाऱ्या भारताच्या शस्त्रसाठ्यावर पाकिस्तानी लष्करानं हल्ला करून तिथे मोठं नुकसान केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. हा दावादेखील खोटा असल्याचं कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या. या ठिकाणांचेही फोटो पत्रकार परिषदेत सादर केल्याचं त्यांनी नमूद केलं.

चौथा दावा – भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये मशि‍दींवर हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. पण पाकिस्तानचा हा दावाही पूर्णपणे खोडून काढला. “भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आमचं लष्कर भारताच्या घटनात्मक मूल्यांचं एक फार सुंदर रुप आहे”, अशी भूमिका कर्नल सोफिया कुरेशी यांनी मांडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोफिया कुरेशी यांच्याप्रमाणेच विंग कमांडर व्योमिका सिंह यांनीही या मुद्द्यावर भूमिका मांडली. “आम्ही प्रत्येक धर्माच्या प्रार्थनास्थळाचा आदर करतो. आमच्या कारवाया प्रामुख्याने दहशतवादी तळ व भारतविरोधी कारवायांसाठी वापरल्या गेलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी होत्या. कोणत्याही धार्मिक स्थळाला भारतीय लष्करानं लक्ष्य केलेलं नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं.