Who is Vishal Yadav: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर गेल्या महिन्यात पाकिस्तानला माहिती पुरविणाऱ्या काही जणांना हरियाणा आणि उत्तर भारतातील विविध राज्यांमधून अटक झाली होती. आता पुन्हा एकदा दिल्लीतील नौदलाच्या मुख्यालयातून विशाल यादव नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. विशाल यादव पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करत असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. गुप्तवार्ता विभागाच्या माहितीनुसार, विशाल यादव सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता. या महिलेने प्रिया शर्मा नावाने आयडी तयार केला होता. या आयडीवर यादव संवेदनशील माहिती पाठवत होता.

दिल्ली पोलीस महानिरीक्षक विष्णू कांत गुप्ता यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या हेरगिरीचा माग काढण्यासाठी राजस्थान पोलिसांचा गुप्तचर विभाग गेल्या काही दिवसांपासून काम करत होता. त्यांच्या तपासात विशाल यादव हा पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. प्रिया शर्मा नावाच्या आयडीवरून एक महिला विशाल यादवकडून नौसेना भवनातील संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत होती, अशी माहिती समोर आली आहे.

विशाल यादव कोण आहे?

विशाल यादव हा हरियाणाचा राहणारा आहे. योगायोग म्हणजे याआधी अटक झालेले अनेक आरोपी हे हरियाणाचेच होते. यादव सध्या नौसेनेच्या मुख्यालयात अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदावर कार्यरत होता. राजस्थान पोलीस गेल्या काही दिवसांपासून विशाल यादवच्या मागावर होते आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते.

ऑनलाइन गेमचे व्यसन

तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, विशाल यादवला ऑनलाइन गेमचे व्यसन जडले होते. यात त्याला मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे तो कर्जात होता. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी विशाल यादवने हेरगिरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावरून प्रिया शर्माच्या संपर्कात

सोशल मीडियावर प्रिया शर्मा नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट खात्याच्या संपर्कात आल्यानंतर विशाल यादवला पैशांचे आमिष दाखविण्यात आले. पैसे मिळविण्यासाठी विशाल यादव प्रिया शर्माच्या आयडीवर महत्त्वाची माहिती पुरविण्याचे काम करत होता. या बदल्यात त्याला क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून पैसे मिळत होते. विशाल यादवच्या अटकेनंतर आता डिजिटल करन्सीचा हेरगिरीत वापर होत असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत.

राजस्थान पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ऑपरेशन सिंदूरदरम्यान विशाल यादवने लष्करी कारवाईशी संबंधित संवेदनशील माहिती शत्रू देशाला पुरविली.

विशाल यादवची अटक झाल्यानंतर त्याला आता जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय यंत्रणा आणि लष्कराच्या विभागासह भारतीय गुप्तचर संस्थांकडून त्याची चौकशी केली जात आहे. यादवने किती माहिती पुरवली आणि यात आणखी किती लोक सामील आहेत, हे शोधण्याचे काम यंत्रणांकडून केले जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर खळबळ

ऑपरेशन सिंदूरनंतर महिन्याभरात राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्रातून हेरगिरीशी संबंधित असलेल्या अनेकांना अटक झाली आहे. हरियाणातील ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्राची अटक झाल्यानंतर हे प्रकरण देशभर गाजले. ज्योतीने अनेकदा पाकिस्तानचा दौरा केला होता. तसेच भारतातील काही संवेदनशील ठिकाणांचे व्लॉग केले होते.