Indian origin man faces 15 year jail over moonlighting in us : न्यूयॉर्क येथील मेहुल गोस्वामी नावाच्या ३९ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला ‘ग्रँड लॅर्सनी’ च्या आरोपाखाली अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गोस्वामी हा न्यूयॉर्क स्टेट ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसमध्ये काम करत असताना, एका कंत्राटदार म्हणून मूनलायटिंग म्हणजे छुप्या पद्धतीने दुसरीकडेही काम करत होता.

न्यू यॉर्क स्टेट इन्स्पेक्टर जनरलचे कार्यालय आणि साराटोगा काउंटी शेरिफ कार्यालयाने संयुक्तपणे केलेल्या तपासात आढळून आले की गोस्वामीचे हे बेकायदेशीर वर्तन करदात्यांच्या ५०००० डॉलर (जवळास ४० लाख रुपये) चा गैरवापर केल्याच्या समान होते, असे वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोस्वामी हा न्यूयॉर्क स्टेट ऑफिसमध्ये रिमोटली काम करत होता. ती त्याची प्रमुख नौकरी होती, पण याचबरोबर त्याने माल्टा येथे मार्च २०२२ पासून GlobalFoundries या एका सेमिकंटक्टर कंपनीत कंत्राटदार म्हणून काम करणे सुरू केले.

एक निनावी इमेल पाठवण्यात आल्याने गोस्वामीविरोधात चौकशीला सुरूवात झाली. या ईमेलमध्ये आरोप करण्यात आला होता की, तो राज्याचा कर्मचारी म्हणून काम करत असताना त्याच वेळेत एका खाजगी कंपनीसाठी काम करत होता.

“सरकारी कर्मचाऱ्यावर प्रामाणिकपणे सेवा देण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते आणि गोस्वामीचे वर्तन कथितपणे विश्वासाचे गंभीर उल्लंघन करणारे आहे. राज्यासाठी काम करत असल्याचा दावा करत दुसरी पूर्णवेळ नोकरी करणे हे करदात्यांच्या पैशांसह सार्वजनिक साधनांचा गैरवापर करणे आहे,” असे इन्स्पेक्टर जनरल लुसी लँग म्हणाल्या, असे वृत्त सीबीएस ६ वृत्तवाहिनीने दिले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी, साराटोगा काउंटी शेरिफच्या कार्यालयाने गोस्वामीला ‘ग्रँड लॅर्सनी’ इन द सेकंड डिग्री साठी अटक केली. न्यूयॉर्कमध्ये हा एक गंभीर क्लास सी गुन्हा मानला जातो, ज्यासाठी कमाव १५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

गोस्वामी याला त्याच आठवड्यात माल्टा टाऊन कोर्टात न्यायाधीश जेम्स ए Fauci यांच्यासमोर हजर करण्यात आले आणि त्याला जामीनशिवाय सोडण्यात आले. हा खटला अद्याप सुरू आहे. न्यूयॉर्क राज्याच्या अपडेटेड कायद्यानुसार, गोस्वामीवर ठेवण्यात आलेले आरोप हे जामिनासाठी पात्र ठरणारे गुन्हे मानले जात नाहीत.

टाइम्स युनियनच्या रिपोर्टनुसार, गोस्वामी सरकारसाठी एक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता आणि २०२४ मध्ये त्याची कमाई ११७८९१ डॉलर्स होती. दरम्यान या प्रकरणामुळे घरातून काम करण्याची परवानगी असलेल्या नोकरीत ‘मूनलायटिंग’ म्हणजेच एकाच वेळी दोन नोकऱ्या करण्याबाबत चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.