Indian Man Killed in Texas: वॉशिंग मशीनमुळे झालेल्या भांडणात एका भारतीय व्यक्तीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेती टेक्सासमध्ये घडला आहे. चंद्रमौली उर्फ बॉब नागमल्लईया असं या ५० वर्षीय व्यक्तीचं नाव होतं. चंद्रमौली हे मूळचे कर्नाटकचे होते. बुधवारी सकाळी टेक्सासमध्ये एका मोटेलमध्ये सहकर्मचाऱ्याशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यांच्या सहकर्मचाऱ्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची पत्नी व १८ वर्षांच्या मुलासमोर त्यांची हत्या करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

डेलास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमौली हे टेक्सासमधील एका मोटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. घटना घडली त्यावेळी त्यांची पत्नी व मुलगा मोटेलमध्येच उपस्थित होते. एका बिघडलेल्या वॉशिंग मशीनवरून चंद्रमौली यांचे त्यांचा सहकर्मचारी यॉर्दनिस कोबोस मार्टिनेझ याच्याशी वाद झाले. भांडणात चंद्रमौली सातत्याने त्यांचं म्हणणं यॉर्दनिसला सांगण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची भाषांतरासाठी मदत घेत होते. हे पाहून यॉर्दनिसचा पारा चढला आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. यॉर्दनिसनं रागाच्या भरात बाजूलाच ठेवलेला मोठा सुरा घेतला आणि चंद्रमौली यांच्यावर हल्ला केला.

समोर उभं राहिलेलं संकट पाहून चंद्रमौली यांनी सुटकेसाठी प्रयत्न केले आणि त्यांनी तिथून पळ काढला. धावत ते मोटेलमध्ये त्यांची पत्नी व मुलगा बसलेल्या ठिकाणी आले. पण यॉर्दनिसचा संताप अद्याप कमी झालेला नव्हता. यॉर्दनिसदेखील धावत त्यांच्यामागे आला. चंद्रमौली यांच्या पत्नी व मुलाने यॉर्दनिसला अडवण्याचा प्रयत्न केला. पण रागाच्या भरात असलेल्या यॉर्दनिसनं त्यांचा विरोध न जुमानता चंद्रमौलींवर हातातल्या सुऱ्याने वार केले. या हल्ल्यात चंद्रमौली यांचा जागीच मृत्यू झाला.

हल्लेखोराची गुन्हेगारी पार्श्वभूमी

दरम्यान, यॉर्दनिसचं याआधीही काही गुन्ह्यांमध्ये नाव आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गाड्यांची चोरी, हिंसक हल्ले अशा प्रकारच्या गुन्ह्यातं हॉस्टनमध्ये त्याचं नाव समोर आलं होतं. बुधवारच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी यॉर्दनिसला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला कायद्यानुसार जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते.

होस्टनमधील भारतीय दूतावासानं घेतली दखल

चंद्रमौळी यांच्या हत्या प्रकरणाची होस्टनमधील भारतीय दूतावासाने दखल घेतली आहे. यासंदर्भात कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडियानं एक्सवर पोस्ट शेअर करून भूमिका मांडली आहे. “चंद्रमौळी यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात कॉन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया सहभागी आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात असून त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहोत. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.