ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अनेकदा सहप्रवासी जोरजोरात फोनवर बोलत असल्याचा किंवा स्पीकरवर गाणी लावून ऐकत असल्याचा त्रास तुम्हीही अनुभवला असेलच. कर्कश आवाजातील ती गाणी आणि फोनवरचं बोलणं त्रास होत असतानाही भांडण टाळण्यासाठी अनेकदा दुर्लक्षित केलं जातं. पण यापुढे अशा बेशिस्त प्रवाशांवर कारवाई होऊ शकते. कारण रेल्वेने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने नवी नियमावली प्रसिद्ध केली असून यामध्ये प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. रेल्वे मंत्रालयाकडे अनेक प्रवासी लोक फोनवर मोठ्याने बोलतात आणि हेडफोनशिवाय गाणी ऐकत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असताना या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

रेल्वेने नव्या आदेशात तिकीट तपासनीस, आरपीएफ, कॅटरिंग आणि कोच अटेंडंटसह ऑन-बोर्ड ट्रेन कर्मचार्‍यांना डब्यांमध्ये प्रवेश करण्याचे आणि प्रवाशांना सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याचे आदेश दिले आहेत. “या कामात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत विनम्रपणे वागण्याची सूचना करण्यात आली असून तक्रारीला कोणतीही जागा ठेवू नये असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेने यावेळी वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.

भारतीय रेल्वेची नवी नियमावली

  • प्रवासी आपल्या फोनवर जोरात बोलणार नाही किंवा स्पीकरवर मोठ्याने गाणी ऐकणार नाहीत
  • तिकीट तपासनीस, रेल्वे कर्मचारी प्रवाशांना त्यांच्या फोनवर मोठ्याने न बोलण्याबद्दल सल्ला देतील.
  • रात्री १० नंतर ट्रेनमधील रात्रीची लाईट वगळता इतर सर्व लाईट बंद कराव्यात
  • एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • प्रवाशांनी तक्रारी केल्यास अशा प्रवाशांवर कारवाई केली जाईल.
  • ६० वर्षांवरील, दिव्यांग, एकट्या महिला प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सर्व आवश्यक मदत दिली जावी.