ट्रेनमधून ‘साइड लोअर बर्थ’ने प्रवास करणाऱ्यांची ‘ती’ कटकट संपणार! रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

भारतीय रेल्वेने प्रवास करताना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, तो म्हणजे ‘साइड लोअर बर्थ सीट’चं आरक्षण असलेल्या प्रवाशांना. पण, आता…

(प्रातिनिधिक छायाचित्र)

भारतीय रेल्वेने प्रवास करताना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, तो म्हणजे ‘साइड लोअर बर्थ सीट’चं आरक्षण असलेल्या प्रवाशांना. पण, आता साइड लोअर बर्थने प्रवास करणारे प्रवासी कंबरदुखीची तक्रार करणार नाहीत. कारण, रेल्वे प्रशासनाने हे आसन आरामदायी बनवण्याची तयारी सुरू केली आहे. साइड बर्थच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले असून याबाबतचा एक व्हिडिओ केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी शेअर केला आहे.

साइड लोअर बर्थने प्रवास करणाऱ्यांचा खऱ्या अर्थाने वेदनादायी प्रवास सुरू होतो, जेव्हा झोपण्यासाठी सीट एकमेकांना जोडले जातात. या प्रक्रियेमध्ये जोडलेले सीट खालीवर राहतात, त्यामुळे त्यावर झोपणाऱ्या प्रवाशांकडून नेहमी पाठदुखी, कंबरदुखीच्या तक्रारी केल्या जातात. सोशल मीडियवरही काही जणांनी तशाप्रकारची तक्रार केली होती. साइड लोअर बर्थ रिझर्व्हेशन अगेंस्ट कँन्सलेशन (आरएसी) प्रवाशांना दिलं जातं. अखेर रेल्वेने या सीटच्या व्यवस्थेत काही बदल केले आहेत. आता दोन्ही सीट जोडल्यानंतर त्यावर दुसरं एक आसन (सीट) टाकता येणार आहे. यामुळे प्रवाशांना झोपताना कोणताही त्रास होणार नाही.


पियूष गोयल यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना, “भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीस्कर प्रवासासाठी प्रयत्नशील आहे…आसनांमध्ये केलेले काही बदल हे त्याचंच उदाहरण आहे. या बदलांमुळे प्रवाशांचा प्रवास अजून आरामदायक झालाय” असं म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian railways innovates makes side berths comfortable sas