Indian Student shot dead in US: अमेरिकन ड्रीम ता भारतीय नागरिकांच्या जीवावर उठले आहे की काय? असा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवली आहे. सप्टेंबर महिन्यात टेक्सास येथे भारतीय वंशाच्या हॉटेल कर्मचाऱ्याचा त्याची पत्नी आणि मुलासमोरच शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर आता टेक्सासमध्येच हैदराबादमधील २७ वर्षीय विद्यार्थी चंद्रशेखर पोल याची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे.

चंद्रशेखर पोल हा उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. टेक्सासमधील डेंटन येथील एका पेट्रोल पंपावर तो पार्ट टाईम नोकरी करत होता. याच पंपावर शुक्रवारी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. शनिवारी दुपारी ही बातमी चंद्रशेखरच्या कुटुंबियांना देण्यात आली.

दंत शस्त्रक्रियेमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यासाठी चंद्रशेखर एफ-१ व्हिसावर अमेरिकेत गेला होता. पदवी पूर्ण केल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून तो नोकरीच्या शोधात होता. दरम्यान त्याने पेट्रोल पंपावर पार्ट टाईम काम करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती चंद्रशेखरचा भाऊ दामोदर याने दिली.

दामोदर पुढे म्हणाला, आमच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आता माझा भाऊ गमावल्यामुळे आई धक्क्यात गेली आहे. बीआरएस आमदार टी हरीश राव यांनी चंद्रशेखरच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

माजी मंत्री टी हरीश राव म्हणाले, आमच्या एलबी नगर भागातील एक हुशार दलित विद्यार्थी म्हणून चंद्रशेखर प्रसिद्ध होता. त्याची खूप मोठी स्वप्न होती. पदव्युत्तर पदवीसाठी तो अमेरिकेत गेला होता. त्याच्या कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का आहे.

पोल कुटुंबियांचे मित्र शिवकुमार यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, पेट्रोल पंपाच्या मॅनेजरकडे चंद्रशेखरचा पासपोर्ट होता म्हणून त्याच्या मृतदेहाची ओळख पटली. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी जेव्हा कुटुंबियांना फोन करून याची माहिती दिली, तेव्हा आम्हाला धक्काच बसला. परराष्ट्र मंत्रालयाने चंद्रशेखरचा मृतदेह भारतात आणण्यास मदत केली तर आम्ही त्यांचे आभारी राहू.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

टेक्सास येथे भारतीय वंशाच्या हॉटेल व्यवस्थापक चंद्रामौली नगमाल्ले (५०) यांची त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच शिरच्छेद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर भाष्य केले होते. त्यांनी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर यासंबंधी पोस्ट केली होती. क्युबामधील एका बेकायदेशीर स्थलांतरिताने चंद्रामौली यांची निर्घृणपणे हत्या केली. हा बेकायदेशीर स्थलांतरित आपल्या देशात असायलाच नको होता, असे ट्रम्प म्हणाले. तसेच ट्रम्प यांनी पीडित चंद्रमौली हे डल्लास येथील एक प्रतिष्ठित नागरिक होते, असेही म्हटले आहे.