Viral Post About Education In UK: लंडनमध्ये मार्केटिंग व्यावसायिक म्हणून काम करणाऱ्या भारतीय तरुणीने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये येऊन पदव्युत्तर पदवी घेणे टाळण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी तरुणीने ब्रिटनमध्ये कमी होत चाललेली नोकरीची संधी कडक व्हिसा नियमांची कारणे दिली आहेत.
एक्सवरील एका व्हायरल पोस्टमध्ये जान्हवी जैन या तरुणीने पदव्युत्तर विद्यार्थिनी म्हणून ब्रिटनमधील तिचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी तिने दावा केला आहे की, तिच्या वर्गमित्रांपैकी जवळजवळ ९० टक्के विद्यार्थ्यी नोकऱ्या न मिळाल्याने त्यांच्या मायदेशी परतले आहेत.
एक्सवरील पोस्टमध्ये या तरुणीने म्हटले की, “मला खूप लोक मास्टर्ससाठी ब्रिटनला येण्याबद्दल मेसेज करतात, मी तुम्हाला सांगेन की इकडे येऊ नका. माझ्या बॅचमधील ९०% विद्यार्थ्यांना परत जावे लागले कारण नोकऱ्याच नाहीत. जोपर्यंत तुमच्याकडे पैसे नाहीत तोपर्यंत ब्रिटनला येण्याचा विचार करू नका.”
ही तरुणी भारतातून पदवीची शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ब्रिटनला गेली होती. जरी तिला नोकरी मिळाली असली तरी तिने तिला नोकरी मिळणे अपवाद असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान तरुणीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यावेळी एका युजरने म्हटले की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळतात. या कमेंटला असहमती दर्शवत तिने उत्तर दिले की, “परिस्थिती इतकी वाईट कधीच वाईट नव्हती. पूर्वी, सुमारे ६० ते ७० टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणानंतर नोकऱ्या मिळायच्या.”
यावर प्रतिक्रिया देताना आणखी एक एक्स युजर म्हणाला की,”यूरोपियन युनियनमध्ये मास्टर्स करणे आणि तिथे कारकिर्द घडवणे आता खूप अवघड झाले आहे. वाढता राहणीमान खर्च, मर्यादित नोकरीच्या संधी आणि कठीण स्पर्धा यामुळे पूर्वीपेक्षा जास्त आव्हाने निर्माण झाली आहे. यूरोपियन युनियन आणि ब्रिटनमधील माझे काही मित्र देखील संघर्ष करत आहेत. काहीजण तर भारतात परतले आहेत.”
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “या प्रामाणिकपणाचे मी कौतुक करतो, असे वाटते की उडी घेण्यापूर्वी या जोखीमीचाही गांभीर्याने विचारल करणे योग्य ठरेल.”
“१०० टक्के खरे आहे, माझ्या मैत्रिणीनेही असेच सांगितले आहे. तिच्या बॅचमधील बहुतेकांना नोकरी मिळाली नाही आणि त्यांना परत मायदेशात यावे लागले,” असे शेवटी एक युजर म्हणाला.