Indian Woman Relocates Munich Germany for Internship : नोकरीनिमित्त जर्मनीला गेलेल्या भारतीय तरुणीला अवघ्या दोनच दिवसांत कंपनीने कामावरून काढून टाकलं आहे. या तरुणीने तिचा अनुभव समाजमाध्यमांवर शेअर करत कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तिच्याबरोबर घडलेली घटना चर्चेचा विषय बनली आहे. काजल टेकवानी असं या तरुणीचं नाव असून ती जर्मनीमधील म्युनिक शहरातील एका स्टार्टअप कंपनीत इंटर्नशीप करत होती. मात्र, कार्यालयात जाऊन काम सुरू केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत कंपनीने तिला कामावरून काढून टाकलं आहे.
काजल टेकवानी म्युनिकमधील कंपनीत इंटर्नशीप सुरू करण्याआधी जर्मनीची राजधानी बर्लिनमधील एका कंपनीत काम करत होती. तिथलं काम सोडून ती बर्लिनहून म्युनिकला स्थायिक झाली. मात्र, कंपनीत रुजू होताच दोन दिवसांनी कंपनीने तिच्याबरोबरचा करार रद्द केला. याबाबत काजलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कंपनीविरोधातील संताप व्यक्त केला आहे.
काजल या इंटर्नशीपसाठी बर्लिनहून म्युनिकला स्थायिक झाली होती. परंतु, कंपनीने अचानक तिचं कंत्राट रद्द केलं. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं की तिने अनेक मुलाखती दिल्या, सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, कंपनीने दिलेली कामं (टास्क) पूर्ण करून दाखवली, तसेच या इंटर्नशीपसाठी तिने इतर कंपन्यांमधील नोकरीच्या संधी नाकारल्या आणि म्युनिकमधील स्टार्टअप कंपनीत ती रुजू झाली होती. मात्र, त्याच कंपनीने तिला अवघ्या दोन दिवसांत घरचा रस्ता दाखवला आहे.
कंपनीने काजलला कामावरून काढून टाकण्याचं काय कारण दिलं?
काजल बर्लिनहून म्युनिकला स्थायिक होत असल्याने कंपनीने तिला म्युनिकमध्ये राहण्यासाठी जागा दिली. पहिले दोन दिवस तिचे वरिष्ठ तिच्या कामावर खूश होते. मात्र दोन दिवसांनी तिथलं वातावरण अचानक बदललं. कंपनीच्या संस्थापकांनी तिच्या कामाच्या पद्धतीवर, वर्तणुकीवर आक्षेप घेतला. तिला अभिप्राय म्हणून तिच्यात उत्साहाचा आभाव असल्याचा शेरा मारला. त्याच संध्याकाळी तिला कामावरून काढत असल्याचं सांगितलं. तसा ईमेलही तिला पाठवला. काजलने इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडीओत याबाबतची माहिती दिली आहे.
काजलने सांगितलं की १ सप्टेंबरपर्यंत ती वर्क फ्रॉम होम करत होती. त्यानंतर ती म्युनिकला स्थायिक झाली. पहिल्या दिवशी कार्यालयात चांगलं वातावरण होतं. परंतु, दुसऱ्या दिवशी डोळ्यांना इन्फेक्शन झाल्यामुळे कार्यालयात पोहोचण्यासाठी तिला काही वेळ उशीर झाला. मात्र, उशीर होणार असल्याची तिने आधीच तिच्या वरिष्ठांना व सहकाऱ्यांना कल्पना दिली होती. तरीदेखील त्याच दिवशी तिला कामावरून काढून टाकण्यात आलं.