India suspends Postal services : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची जगात चर्चा सुरू आहे. खरं तर अमेरिकेचे दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयामध्ये प्रामुख्याने टॅरिफची (आयात शुल्क) जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरही जवळपास ५० टक्के टॅरिफ लादलं आहे. एवढंच नाही तर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प भारतावर सातत्याने टीकाही करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के व्यापार करामुळे अमेरिका आणि भारतामध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारताने रशियन तेल खरेदी थांबवावी यासाठी ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दबावाला भारत जुमानत नाहीये. दरम्यान, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफच्या निर्णयानंतर आता भारताने एक मोठं पाऊल उचललं आहे. भारताने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने आणलेल्या प्रमुख नियामक बदलांना प्रतिसाद म्हणून भारताच्या पोस्ट विभागाने शनिवारी २५ ऑगस्ट २०२५ पासून अमेरिकेला जाणाऱ्या बहुतेक आंतरराष्ट्रीय टपाल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकन प्रशासनाने ३० जुलै २०२५ रोजी एक कार्यकारी आदेश जारी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ८०० अमेरिकन डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंसाठी शुल्कमुक्त किमान सवलत मागे घेण्यात आली होती. जी पूर्वी कमी किमतीच्या वस्तूंना सीमाशुल्काशिवाय अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी होती. मात्र, आता परिणामी अमेरिकेला जाणाऱ्या हवाई कंपन्यांनी २५ ऑगस्ट २०२५ नंतर पोस्टल कन्साइनमेंट स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली आहे. कारण त्यांच्याकडे ऑपरेशनल आणि तांत्रिक तयारीचा अभाव असल्याचं कारण सांगितलं जात आहे.