Israel-Iran Conflict: इस्रायल आणि इराण यांच्यात सशस्त्र संघर्ष सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे इराणमधील २०० हून अधिक लोक मारले गेले असल्याचे समोर आले आहे. अनेक देशांनी इराणमधील आपापल्या नागरिकांना बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. इराण-इस्त्रायल संघर्ष युद्धामध्ये परावर्तित झाल्यास काय परिणाम होतील? या विषयावर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आपले विचार मांडले आहेत.

गिरीश कुबेर म्हणाले की, इस्रायलने एकाच वेळी पॅलेस्टिन, हेजबोला, हमास, सीरिया, लेबनॉन यांच्या विरोधात लढा सुरू केलेला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनाही रोखण्यासाठी ते लढत आहेत, त्यामुळे इराणविरोधात ते लढतील की नाही अशी शंका होती. मात्र, पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी ही शंका पोकळ ठरवली आणि इराणवर हल्ला केला.

कुठलाही देश जेव्हा दुसऱ्या एका देशावर हल्ला करतो तेव्हा एक गोष्ट अपेक्षित असते की, मागे येण्याचा रस्ता काय? कुठल्या गोष्टीवर लढा थांबवायचा? हा प्रश्न इस्रायलसमोर आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. इराणमधील अणू कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करून टाकू, अशी भूमिका इस्रायलने घेतलेली आहे. इस्रायल स्वतः अणूशस्त्र सज्ज असलेला देश इराणवर आण्विक कार्यक्रम न राबविण्याची सक्ती करत असल्याबाबत इस्रायलच्याच माजी पंतप्रधानांनी टीका केलेली आहे, असेही गिरीश कुबेर पुढे म्हणाले.

इराणचे इस्रायलच्या दादागिरीला उत्तर

गिरीश कुबेर पुढे म्हणाले, “इराण आणि इस्रायल या दोन देशांची आंतरराष्ट्रीय नियम पालनाबद्दल तुलना केल्यास असे लक्षात येते की, इराणने अनेक नियम पाळले आहेत. इराणने आपली अणू यंत्रणा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. इस्रायलने ती दिलेली नाही. अणुऊर्जेसंबंधी जे करार होतात, त्याला इराण सामोरे गेलेला आहे, त्यामुळे इस्रायलने अशाप्रकारची बळजबरी करणे हे दादागिरीसारखे होते. त्या दादागिरीला आव्हान देण्याची ताकद इराणध्येच आहे असे मानले जात होते.”

इस्रायलच्या आर्यन डोमला इराणचा छेद

इस्रायलने आर्यन डोमची यंत्रणा विकसित केली होती. बाहेरून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना रोखण्यासाठी जणू काही लोखंडी पांघरूण अंथरल्यासारखी ही यंत्रणा होती. या यंत्रणेचा पहिल्यांदा पराभव होताना दिसत आहे. इस्रायलमधील तेल अविव, हायफ आणि इतर मध्यवर्ती शहरांवर इराणचे बॉम्ब पडले आहेत. याआधी असे कधीही घडले नव्हते, याकडेही गिरीश कुबेर यांनी लक्ष वेधले.

भारताची तटस्थता अनाकलनीय

इस्रायलने इराणच्या विरोधात आघाडी उघडल्यानंतर अमेरिकेने यापासून हात झटकले आहेत, तर अनेक देशांनी याचा विरोध केलेला आहे. मात्र, भारतासारख्या देशाने भूमिका घेतलेली नाही. आपण इस्रायल किंवा इराणच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. कधी कधी तटस्थ राहणे म्हणजे दांडगाई करणाऱ्याच्या बाजूने उभे राहणे असा त्याचा अर्थ होतो. आपले तटस्थ असणे हे इस्रायलला पाठिंबा देण्यासारखे आहे असे दिसते. भूतानसारख्या देशानेही या संघर्षात भूमिका घेतलेली असतानाही भारताची तटस्थता गोंधळात टाकणारी आहे, असेही गिरीश कुबेर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराण आपल्यासाठी महत्त्वाचा देश

गिरीश कुबेर यांनी पुढे म्हटले, “इराण देश भारतासाठी महत्त्वाचा आहे. इराणमधील चाबहार बंदर भारत विकसित करत आहे. पाकिस्तानला पर्याय म्हणून आपण इराणकडे पाहत आहोत. इराण असा एकच देश आहे, जो भारताला तेल उधारीवर देतो. हा एकच देश असा आहे, ज्याच्याशी आपण रुपयात व्यवहार करतो. अशा देशाला आपण एकटे सोडत आहोत. अशावेळी आपल्या परराष्ट्र नितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात.”