Congress भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही संपलेला नाही. अशा स्थितीत भारताने ७ मे रोजी मध्यरात्री एअरस्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ले करण्यात आले. त्यामध्ये, १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहितीही सरकारतर्फे देण्यात आली. या हल्ल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सीमारेषेवरील गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवण्यात आल्या आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन शस्त्रविराम झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम झाला. मात्र त्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली ज्याला भारताने चोख उत्तर दिलं.
काँग्रेसने जागवल्या १९७१ च्या आठवणी
दरम्यान एकीकडे भारताने पाकिस्तान नरमला शस्त्रविराम झाला म्हणून मोदी सरकारचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या १९७१ च्या आठवणी जागवल्या जात आहेत. इंदिरा गांधी होणं सोपं नाही असं म्हणत काँग्रेसकडून इंदिरा गांधीचे जुने व्हिडिओ व फोटो शेअर केले जात आहेत. काँग्रेस नेते मोठ्या प्रमाणावर हे फोटो पोस्ट करत आहेत. इंदिरा गांधी हा हॅशटॅगही ट्वीटरवर ट्रेंड आहे.
इंदिरा गांधींनी केले होते पाकिस्तानचे दोन तुकडे
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १८७१ मध्ये त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. ज्यानंतर बांग्लादेशची निर्मिती झाली. या ऐतिहासिक घटनेच्या शिल्पकार म्हणून इंदिरा गांधींना ओळखलं जातं. तसंच पाकिस्तानला लक्षात राहिल असा धडा त्यांनी शिकवला असंही अनेकांनी म्हटलं होतं. आज पुन्हा एकदा त्या आठवणींना काँग्रेसकडून उजाळा दिला जातो आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात गेल्या ७ मेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आलेल्या फोन कॉलनंतर भारताने याबाबतची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य दलाच्या कारवाई थांबल्याची घोषणा होताच, काँग्रेसकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. इंदिरा गांधींनी १९७१ च्या युद्धावेळी घेतलेल्या कणखर भूमिकेची आठवण करुन दिली जात आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करत इंदिरा होना आसान नही असंही अनेकांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अशा पोस्ट काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांकडून केल्या जात आहेत. मोदी सरकारने जे उत्तर दिलं त्यानंतर त्या कारवाईचं तमाम देशाने आणि विरोधी पक्षांनी सगळ्यांनीच स्वागत केलं. मात्र आता काँग्रेसकडून १६ डिसेंबर १९७१ च्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत.