आरोग्यतज्ज्ञांचा पंतप्रधानांना अहवाल; देशात सामाजिक संक्रमण झाल्याचाही दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात करोना साथरोगकाळात निर्णय घेताना साथरोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला नाही, तो घेतला असता तर प्रारूपकर्त्यांपेक्षा जास्त माहिती असलेल्या या तज्ज्ञांनी नक्कीच योग्य सल्ले दिले असते. धोरणकर्ते सामान्य प्रशासनातील नोकरशहांवर विसंबून राहिले. त्यात सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंधात्मक उपाय, समाज शास्त्रज्ञ यांच्याशी फार कमी सल्लामसलत केली गेली, असा ठपका आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. या तज्ज्ञांत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे डॉक्टर, आयसीएमआरचे दोन सदस्य यांचा समावेश आहे.

सरकारने अतिशय वेगाने धोरणे बदलली, त्यातूनच पश्चातबुद्धी प्रकार दिसून आला. साथरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला असता तर असे झाले नसते, असेही अहवालात म्हटले आहे.

देशातील काही मोठे गट व लोकसंख्येचे उपगट यांच्यात करोनाचे सामाजिक संक्रमण सुरु झाले असल्याची माहिती या आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. सरकारने मात्र वेळोवेळी सामाजिक संक्रमण सुरू झाल्याचे कबूल करण्यास नकार दिला आहे.

देशातील बळींची संख्या आता ५३९४ झाली असून रुग्ण संख्या १९०५३५ आहे.  आता भारत करोना संसर्गात सातव्या क्रमांकावर आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेन्टिव्ह अँड सोशल मेडिसीन, इंडियन असोसिएशन ऑफ एपिडिमॉलॉजिस्ट यांच्या पथकाने सामाजिक संसर्ग सुरू झाल्याचा अहवाल पंतप्रधानांना सादर केला आहे.

या अहवालात असे म्हटले आहे,की समाजाच्या मोठय़ा  भागात सामाजिक संक्रमण झाले असून या परिस्थितीत कोविड १९ ची साथ लगेच जाईल असे समजण्याचे कारण नाही. लोकसंख्येच्या विविध गटात या रोगाचा प्रसार झाला आहे. टाळेबंदीच्या काळात पायाभूत सुविधा निर्माण करून नियोजनपूर्वक करोनाचा आलेख सपाट करण्याचा प्रयत्न होता. त्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ नये हा हेतू होता. तो चौथ्या टाळेबंदीनंतर साध्य झाला असून त्यासाठी आपल्याला आर्थिक मोल द्यावे लागले शिवाय लोकांची गैरसोय झाली.

कोविड कामगिरी दलातील आयएपीएसएमचे माजी अध्यक्ष डॉ. शशिकांत, आयपीएचएचे अध्यक्ष डॉ.संजय राय , बीएचयूच्या कम्युनिटी मेडिसीनचे माजी प्रमुख डॉ. डी.सी.एस रेड्डी, पीजीआयएमइआरचे माजी प्राध्यापक डॉ. राजेश कुमार यांच्या समितीने हा अहवाल सादर केला आहे. डॉ. रेड्डी व डॉ. कांत हे आयसीएमआरचे प्रमुख आहेत. २५ मार्चपासून ३१ मे पर्यंत जी टाळेबंदी केली ती कठोर होती पण तरी रुग्ण वाढले. २५ मार्चला ही संख्या ६०६ होती, ती २४ मे रोजी १३८८४५ झाली. एका प्रतिष्ठित संस्थेने जगात २२ लाख व भारतातही लाखो मृत्यू होतील असे भाकीत केले होते ते चुकीचे ठरले आहे. साथरोगकाळात निर्णय घेताना साथरोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला नाही, तो घेतला असता तर प्रारूपकर्त्यांपेक्षा जास्त माहिती असलेल्या या तज्ज्ञांनी नक्कीच योग्य सल्ले दिले असते, असेही अहवालात म्हटले आहे.

एप्रिलपर्यंत लक्षणहीन रुग्णांचे प्रमाण २८ टक्के

देशात २२ जानेवारी ते ३० एप्रिल याकाळात लक्षणे नसलेल्या कोविड १९ रुग्णांची संख्या २८ टक्के म्हणजे ४०१८४ असून त्यांच्या चाचण्या मात्र सकारात्मक आलेल्या आहेत, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून करोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्या लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यांच्यात लक्षणहीन रुग्ण अधिक आहेत, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये एकूण संसर्गाचे प्रमाण ५.२ टक्के असल्याचे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रीसर्च या संस्थेच्या शोधनिबंधात म्हटले आहे. या अभ्यासानुसार लक्षणहीन रुग्णांचे प्रमाण २८.१ टक्के रुग्ण हे उच्च जोखीम संपर्क व्यक्ती असून २.८ टक्के आरोग्य कर्मचारी आहेत. ते निश्चित रुग्णांच्या संपर्कात आले होते. आयसीएमआर या राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्थेचे मनोज मुऱ्हेकर यांनी सांगितले,की लक्षणहीन रुग्णांचे प्रमाण २८.१ टक्क्य़ांपेक्षा अधिक असू शकते, तोच मोठा चिंतेचा  भाग आहे. लक्षणहीन रुग्णात निश्चित रुग्ण अधिक आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infectious diseases ignored by policy makers abn
First published on: 02-06-2020 at 00:11 IST