Influencer Sharmishta Panoli Arrest Case : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिच्याविरोधात पोलिसांत तक्रार देणाऱ्या व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. या तक्रारीनंतरच कारवाई करत पोलिसांनी तिला अटक केली होती. दरम्यान कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या पनोलीला २१ मे रोजी गुरुग्राम येथून अटक करण्यात आली होती. तर तिच्याविरोधात तक्रार देणारा वजाहत खान कथितपणे १ जून पासून फरार होता. पोलिसांनी खान याला अनेक समन्स पाठवले होते, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी छापेमारी करण्यात आली, ज्यादरम्यान त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
खान याच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवणे आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कोलकाताच्या गोल्फ ग्रीन पोलीस ठाण्यात गु्न्हा नोंदण्यात आला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खान याला गार्डनर रीच येथील त्याच्या घरी तीन नोटीसा पाठवल्या होत्या ज्यामध्ये त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, पण अटक होईपर्यंत खान हा फरार राहिला
दुसरीकडे शर्मिष्ठा पनोलीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर तीव्र नाराजी व्यक्त करण्याऱ्या प्रतिक्रिया आल्यानंतर तिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली होती.
पनोलीने तिच्या व्हिडीओमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल मौन बाळगल्याच्या मुद्द्यावर मुस्लिम बॉलिवूड कलाकारांवर टीका केली होती, ज्यामध्ये तिने आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानंतर तिला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आणि तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. दरम्यान टीका झाल्यानंतर पनोलीने सोशल मीडियावरून तो व्हिडीओ डिलिट केला होता, इतकेच नाही तर जाहीर माफी देखील मागितली.
दरम्यान शर्मिष्ठा पनोलीला अटक झाल्यापासून खान बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते. त्याचे वडील सआदत खान यांनी वजाहत हा घरी परतला नसल्याचे सांगितले. तसेच पनोलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबाला धमकीचे फोन येत असल्याचे ते म्हणाले.
यादरम्यान वाजहत खान याच्याविरोधात कोलकाता पोलिसांकडे श्री राम स्वाभिमान परिषदेने रितसर तक्रार दाखल केली होती. २ जूनला दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत खान याने हिंदू देवता, धार्मिक परंपरा आणि एकंदरीत समुदायाला लक्ष्य करत अपमानास्पद, प्रक्षोभक आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर बद्दल केलेल्या पोस्टसंबंधीत प्रकरणात पनोलीला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच तिला जामीनासाठी अट घालण्यात आली असून चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तीला १०,००० रुपये इतकी रक्कम डिपॉजीट म्हणून भरण्यास सांगण्यात आले आहे.