भारतात प्रवेश करण्यासाठी बेकायदेशीररीत्या मोर्चेबांधणी केल्याच्या आरोपावरून वॉलमार्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय केंद्र सरकारने याप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने गुरुवारी घेतला. सरकारने पंजाबचे माजी मुख्य न्यायमूर्ती आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्या. मुकुल मुदगल यांच्या एकसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती वॉलमार्टसंबंधी सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल पुढील महिन्यात सरकारला देणार आहे. गुरुवारी येथे झालेल्या बैठकीला कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भारतातील औद्योगिक योजना आणि कंपनीने केलेल्या मोर्चेबांधणीसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी वॉलमार्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.