Punjab Cop Amandeep Kaur: पोलिसांनी वर्दीत रिल बनवू नयेत, असे आदेश पोलीस दलाकडून अनेकदा देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातील पोलीस विभागानेही पोलिसांना गणवेश अंगावर असताना रिल शूट न करण्याचे आवाहन केलेले आहे. तरीही अनेक पोलीस सदर आदेशाला हरताळ फासून गणवेशावर असताना फोटोशूट, रिल बनवत असतात. पंजाबच्या पोलीस दलातील लेडी कॉप म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अमनदीप कौर यादेखील अशाच पद्धतीने रिल स्टार बनल्या होत्या. मात्र आता त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. १७ ग्रॅम अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पंजाब पोलिसांनी सध्या अमली पदार्थाविरोधात मोहीम उघडली आहे. बठिंडा येथे अमनदीप कौर यांच्या आलिशान थार गाडीत अमली पदार्थ आढळून आले. अमली पदार्थ विरोधी पथकाने अमनदीप यांची गाडी रोखली असता त्यांनी पथकातील पोलिसांनाच धमकविण्याचा प्रयत्न केला. पण गाडी तपासल्याशिवाय सोडणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर अमनदीप कौर यांनी तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अमनदीप यांच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. हरियाणामध्ये त्या अमली पदार्थाची विक्री करायच्या, असा आरोप करण्यात येत आहे. पोलीस दलात ‘मेरी जान’ या नावाने त्या ओळखल्या जात होत्या.

कोण आहेत अमनदीप कौर?

अमनदीप कौर पंजाब पोलीस दलात शिपाई पदावर काम करत आहे. सध्या बठिंडा येथे त्या कार्यरत आहेत. पंजाबी गाण्यांच्या पार्श्वसंगीतावर रिल बनवून ते सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या. त्यांचे १४ हजार फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर गणवेशात आणि अलिशान थार गाडीत रिल बनविल्यामुळे त्या वादात अडकल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता नोकरी गमवावी लागली

पोलीस मुख्यालयाचे अधिकारी सुखचैन सिंग यांनी सांगितले की, अमली पदार्थांसह महिला पोलीस शिपाई सापडल्यामुळे त्यांना सध्या कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच सरकारी नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. जर संपत्तीमध्ये काही चुकीचे आढळल्यास त्यावरही जप्तीची कारवाई करण्यात येईल.