आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाने पृथ्वीला एक लाखावी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. आयएसएस हे अवकाशस्थानक म्हणजे एक प्रयोगशाळाच असून तेथे अवकाशवीरांचे वास्तव्य असते, ते तेथे विविध प्रकारचे प्रयोग करीत असतात. एक लाखावी प्रदक्षिणा सोमवारी पूर्ण झाल्याचे रशियन नियंत्रण कक्षाने म्हटले आहे. मॉस्कोच्या अवकाशस्थानक नियंत्रण कक्षाने म्हटल्यानुसार हे स्थानक अवकाशात सोडल्यानंतर त्याने पृथ्वीला ज्या प्रदक्षिणा केल्या आहेत त्यातील ही एक लाखावी होती. अवकाशस्थानकहे अडीचशे मैल म्हणजे ४०० किलोमीटर उंचीवर असून ते १७५०० मैल म्हणजे ताशी २८ हजार किलोमीटर वेगाने फिरत आहे. अवकाशस्थानकदर ९० मिनिटांनी पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करते. एक लाखावी प्रदक्षिणा मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी ७.३५ ते ९.१० वाजण्याच्या दरम्यान झाली असे नियंत्रण कक्षाने सांगितले. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाने २.६ अब्ज मैल अंतर प्रवास केला आहे असे नासाने ट्विटरवर म्हटले आहे. अमेरिकेचे फ्लाइट इंजिनिअर जेफ विल्यम्स यांनी सांगितले, की हा अवकाशस्थानकाच्या प्रकल्पातील मोठा टप्पा आहे. युरोपियन स्पेस एजन्सी, रशिया, कॅनडा, जपान व अमेरिका यांचा यात मोठा हातभार आहे यात शंका नाही.
आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या तिसऱ्या मोहिमेत सहभागी असलेले विल्यम्स व त्यांचे सहकारी नासाचे अवकाशवीर टिमोथी कोप्रा, ब्रिटनचे टीम पीक, रशियाचे युरी मालेशेन्को, अलेक्सी ओव्हशिनीन, ओलेग स्क्रिपोशका, मॅक्झिम मातायुशिन यांनी आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या या टप्प्याचे स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याचा हा उत्तम नमुना आहे व त्यात मानवी संस्कृतीस उपयुक्त असलेले अनेक महत्त्वाचे प्रयोग या अवकाशस्थानकात राहून वैज्ञानिकांनी आतापर्यंत केले आहेत असे मातायुशिन यांनी सांगितले. अवकाशस्थानकाच्या पहिल्या भागाला झारया किंवा डॉन असे रशियन भाषेत म्हणतात. १७ वर्षांपूर्वी २० नोव्हेंबर १९९८ रोजी हा भाग सोडण्यात आला होता.
अमेरिकी अवकाशवीर बिल शेफर्ड व रशियाचे सर्जेई किर्कालेव व युरी गिडझेन्को पहिल्यांदा २००० मध्ये अवकाशस्थानकात आले. नंतर आळीपाळीने या प्रकल्पातील देशांचे अवकाशवीर सतत तेथे राहिले. दोन टप्प्यांचे अवकाशस्थानक आता १५ टप्प्यांचे आहे व एका फुटबॉल मैदानाएवढे मोठे आहे. त्यासाठी १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे त्याचे आयुष्यही भरपूर आहे. अमेरिकेने स्पेस शटल कार्यक्रम बंद केल्यानंतर रशियाच कझाकिस्तानातील बैकानूर अवकाशतळावरून अंतराळवीरांना अवकाशस्थानकात नेत आहे. तेथे नेहमी सहा अवकाशवीर असतात. सोयुझ कॅप्सूलमधून अवकाशवीर तेथे जातात व परत येतात. एकूण तीन अवकाशवीरांना एकावेळी नेले जाते व आणले जाते. अवकाशस्थानकात २२६ अवकाशवीर जाऊन आले असून, त्यात सुनीता विल्यम्ससह काही महिलांचाही समावेश आहे. हे अवकाशस्थानक २०२४ पर्यंत कार्यरत राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनासाNasa
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International space station
First published on: 21-05-2016 at 01:56 IST