अॅपलचा बहुचर्चित आयफोन एक्स अखेर लाँच झाला. जगभरातील आयफोनप्रेमींना आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसपेक्षा जास्त उत्सुकता आयफोन एक्सबद्दल होती. त्यामुळेच आयफोन एक्स हा अॅपलचा नवा स्मार्टफोन आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसपेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंग, फेस आयडी आणि बेझेललेस डिस्प्लेचा समावेश आहे.

अॅपल कंपनीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने लाँच करण्यात आलेला आयफोन एक्स अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसच्या तुलनेत आयफोन एक्समधील अनेक फिचर्स उजवे ठरतात. फेस आयडी हे आयफोन एक्सचे विशेष वैशिष्ट्य आहे. या नव्या वैशिष्ट्यामुळे फोनमध्ये टच आयडी (फिंगरप्रिंट सेन्सर) देण्यात आलेले नाही. फेस आयडी टच आयडीपेक्षा जास्त सुरक्षित असणार आहे. यामुळे आयफोन एक्सच्या वापरकर्त्याचा चेहराच त्याचा पासवर्ड असेल.

आयफोन एक्सचा डिस्प्ले अतिशय लक्षवेधी आहे. ५.८ इंचांच्या बेझललेस डिस्प्लेमुळे आयफोन एक्सला अतिशय शानदार लूक मिळाला आहे. या फोनच्या स्क्रीनचे रिझोल्युशन ११२५x२४३६ पिक्सेल इतके आहे. याआधी आयफोनच्या कोणत्याही मॉडेलमध्ये अशा प्रकारचा डिस्प्ले देण्यात आलेला नाही. याशिवाय आयफोनची ओळख असणारे होम बटणदेखील या फोनला देण्यात आलेले नाही. दहा वर्षांमध्ये प्रथमच आयफोनला होम बटण नसेल. त्यामुळे फोनचा डिस्प्ले अधिक मोठा झाला आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी ८ ला टक्कर देण्यासाठी कंपनीकडून अशा प्रकारचे डिझाईन तयार करण्यात आले आहे.

आयफोन एक्समध्ये १२ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एका कॅमेऱ्याला एफ/१.८ अपार्चर देण्यात आला असून, दुसऱ्या कॅमेऱ्यात टेलिफोटो लेन्स असेल. एफ/२.४ अपार्चर हे या लेन्सचे वैशिष्ट्य असेल. या फोनचा सेल्फी कॅमेरा ७ मेगापिक्सलचा आहे. पोट्रेट मोड फिचर या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य असणार आहे. याशिवाय ट्रू डेप्थ कॅमेऱ्याच्या मदतीने तयार होणारे अॅनिमोजीमुळे (अॅनिमेशन इमोजी) या फोनच्या वैशिष्ट्यांमध्ये आणखी भर पडली आहे. आयफोन एक्समध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

या फोनच्या ६४ जीबीच्या मॉडेलची किंमत ८९ हजार रुपये असेल. तर २५६ जीबीच्या मॉडेलसाठी १ लाख २ हजार रुपये मोजावे लागतील. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा फोन भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनसाठी प्री-ऑर्डर बुकिंग २७ ऑक्टोबरपासून करता येईल.