Shikhar Dhawan and Suresh Raina Case: बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी संकेतस्थळाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची ११.१४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यानंतर हैदराबादचे पोलीस आयुक्त व्हीसी सज्जनार यांनी दोन्ही क्रिकेटपटूंवर टीका केली असून असे सेलिब्रिटी आदर्श होऊ शकतात का? असा सवाल उपस्थित केला आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्तीमध्ये सुरेश रैनाची ६.६४ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक तसेच शिखर धवनच्या नावावर ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. यानंतर बेटिंग प्रकरणात आतापर्यंत ठाम भूमिका घेत आलेल्या सज्जनार यांनी दोन्ही क्रिकेटपटूंना फटकारले आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हैदराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार म्हणाले की, हे लोक कोणत्या प्रकारचे सेलिब्रिटी आहेत? “बेटिंगच्या व्यसनामुळे असंख्य तरूण स्वतःच्या हातांनी त्यांचे जीवन उध्वस्त करत आहेत. समाजाला दुःखाच्या दरीत ढकलणाऱ्या बेटिंगच्या राक्षसाला प्रोत्साहन देणारे लोक या गोष्टींसाठी जबाबदार नाहीत का?”, असा सवाल सज्जनार यांनी उपस्थित केला.

व्हीसी सज्जनार पुढे म्हणाले, “समाजाचे भले होईल असे काही शब्द बोला आणि युवकांना त्यांच्या आयुष्यात प्रगती करता येईल, यासाठी मदत करा. पण तुम्हाला आदर्श माननाऱ्या युवकांची दिशाभूल करू नका, जेणेकरून ते स्वतःचे जीवन संपवतील.”

प्रकरण काय आहे?

सप्टेंबर महिन्यात ऑनलाईन बेटिंग प्रकरणात ईडीने सुरेश धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांचे जबाब नोंदवले होते. ईडीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, बेकायदेशीर ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet च्या संचालकांविरुद्ध अनेक राज्यात पोलिसांनी एफआयआर नोंदवले होते. त्यावर आधारित पीएमएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीच्या तपासात आढळून आले की, शिखर धवन आणि सुरेश रैना आणि इतरांनी 1xBet आणि त्यांच्या सरोगेट्स ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या. यासाठी विदेशी संस्थाबरोबर एंडोर्समेंट करार केले. ईडीच्या प्रवक्त्याने म्हटले, एंडोर्समेंट करार विदेशी संस्थांद्वारे पाठलेल्या पैशांच्या बदल्यात केले गेले. जेणेकरून निधीचा बेकायदेशीर स्त्रोत लपवून ठेवता येईल. या जाहिरातींद्वारे प्लॅटफॉर्मचा प्रचार झाला असा आरोप ईडीने केला आहे.

IPS VC Sajjanar
आयपीएस व्हीसी सज्जनार यांनी हैदराबाद येथील बस अपघातानंतर दारूडे चालक दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत, असे विधान केले होते.

आयपीएस व्हीसी सज्जनार कोण आहेत?

१९९६ च्या बॅचचे अधिकारी आयपीएस सज्जनार हे ऑनलाईन बेटिंग आणि जुगार ॲप्सविरोधात सक्रियपणे मोहीम चालवत आहेत. तसेच या प्रकाराला ते संघटीत गुन्हेगारी म्हणून संबोधतात. बेटिंग ॲप्सला प्रोत्साहन देण्यासाठी सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती जाहिराती करत असतात त्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात यावे, असे विधान त्यांनी केले होते.