Israeli Spiese Hangs: इराण आणि इस्रायल यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाल्यानंतर आता इराणने देशाअंतर्गत कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादशी संबंध असल्याचा आरोप ठेवत इराणने तीन जणांना फाशीची शिक्षा दिली आहे, अशी बातमी मिझान वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच इस्रायलशी संबंध असल्याचा आरोप करत ७०० जणांना अटक करण्यात आली आहे.
तब्बल १२ दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष थांबला. फाशी दिलेल्या तीन लोकांनी इस्रायलच्या मोसादशी संबंध ठेवत एका अज्ञात व्यक्तीच्या हत्येसाठी हत्यारांची तस्करी केल्याचा आरोप ठेवला गेला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद रसूल यांनी इस्रायलला सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तीनही आरोपींना आज सकाळी तुर्किये देशाच्या सीमेजवळ असलेल्या उर्मिया शहरात फाशीची शिक्षा देण्यात आली.
इस्रायल आणि इराण यांच्यात १३ जून रोजी युद्ध सुरू झालं होतं. त्यानंतर इराणनं इस्रायलशी संबंधित असलेल्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. ॲमनेस्टी इंटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्यांमध्ये चीन नंतर इराणचा क्रमांक लागतो.