Iran-Israel Conflict : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आठवा दिवस आहे. यादरम्यान शुक्रवारी दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरूच ठेवले आहेत. इस्रायलने इराणच्या अणु पायाभूत सुविधांना लक्ष्य केले, तर तेहरानने इस्रायलवर ‘क्लस्टर म्युनिशन्स’ असलेली क्षेपणास्त्र डगली आहेत, ज्यामध्ये एका रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात या प्रकारचे शस्त्र पहिल्यांदाच वापरण्यात आले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष शिगेला पोहचला असून तो कमी होण्याची किंवा राजनैतिक मार्गाने तोडगा काढला जाण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.

यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या नेतृत्वाला या रुग्णालयावरील हल्ल्याची पू्र्ण किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी इराणविरोधातील लष्करी मोहिमेत इस्रायल वेळापत्रकात अपेक्षेपेक्षा पुढे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यातच व्हाईट हाऊसकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन आठवड्यांमध्ये इस्त्रायलला लष्करी पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल निर्णय घेतील असे सांगण्यात आले आहे. यामुळे या संघर्षाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी व्हाईट हाऊसने अयातुल्ला अली खामेनी यांनी परवानगी दिल्यानंतर इराण निश्चितपणे दोन आठवड्यांत अण्वस्त्र तयार करू शकेल, असे म्हटले होते. या सर्व घडामोडींदरम्यान दुसरीकडे ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी फोनवरू अनेकवेळा चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान सध्या इस्रायल आणि इराणमधील संघर्षाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रात इस्रायलच्या दक्षिण भागातील मुख्य रुग्णालय उद्ध्वस्त झाले. तसेच, इतर काही क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील उंच इमारती आणि इतर नागरी भागांना लक्ष्य केले आहे. यात इस्रायलमधील ४० जण जखमी झाले. या हल्ल्यांनंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे अस्तित्वही उरणार नाही, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिला. दरम्यान, संघर्षाच्या सातव्या इस्रायलनेही इराणच्या अरक या घन जल अणुभट्टीला लक्ष्य केले.

क्लस्टर बॉम्ब काय असतो?

क्लस्टर बॉम्ब एक वेगळ्या प्रकारचे शस्त्र आहे, ज्यामध्ये एक मोठा बॉम्ब असतो ज्याचा लक्ष्याच्या जवळ पोहचल्यानंतर हवेत स्फोट होतो आणि त्यामधून शेकडो लहान-लहान बॉम्ब बाहेर पडतात. याला बॉम्बलेट्स (Bomblets) म्हटले जाते. हे बाहेर पडून मोठी जागा व्यापतात.

क्लस्टर बॉम्ब काम कसे करतात?

विमानातून किंवा क्षेपणास्त्राच्या मदतीने हे बॉम्ब डागले जातात. लक्ष्यावर पोहचल्यानंतर बॉम्ब हवेत उघडतो आणि शेकडो बॉम्बलेट्स बाहेर पडतात. हे बॉम्बलेट्स जमीनीवर पडतात आणि यांचा लगेचच स्फोट होतो किंवा फ्यूजनुसार नंतर स्फोट होतो.

या बॉम्बलेट्सची निर्मिती अशी केली जातो की यांच्यामुळे मोठ्या भागात पसरलेल्या लष्कराच्या वाहनांचे, सैनिकांचे किंवा इतर कोणत्याही लक्ष्याचे जास्तीत जास्त नुकसान होईल. याचे प्रभावक्षेत्र अने फूटबॉल मैदानांपेक्षा अधिक असू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे बॉम्बलेट्स नेहमीच सर्वच्या सर्व फुटत नाहीत, काही जमिनीत लपून राहतात आणि पुढील अनेक वर्ष नागरिकांसाठी जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळेच १०० हून अधिक देशांनी क्लस्टर बॉम्ब वापरावर बंदी घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय करारावर सही केली आहे. पण अमेरिक, रशिया, चीन, इस्त्रायल, भारत आणि पाकिस्तान यासारख्या देशांनी यावर सही केलेली नाही.