Iran Israel war : इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षाची धार आणखी तीव्र होते आहे. दरम्यान ऑपरेशन सिंधु राबवत आत्तापर्यंत ८२७ भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना इराणमधून भारतात आणण्यात आलं आहे. रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी काही काश्मिरी विद्यार्थी, विद्यार्थिनी इराणहून परतले त्यावेळी त्यांनी तिथली भयावह परिस्थिती काय आहे ते सांगितलं.
२१ वर्षीय मरिया मंझूरने काय सांगितलं?
२१ वर्षीय मरीया मंझूरने सांगितलं ती मागच्या दहा महिन्यांपासून इराणमध्ये MBBS चा कोर्स करत होती. साधारण आठवड्याभरापूर्वी मला तेहरान येथील महाविद्यालायतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. आम्हाला क्वूवोम या ठिकाणी नेण्यात आलं. मात्र त्या ठिकाणीही हल्ले सुरु होते. त्यानंतर आम्हाला मशह्हाद या ठिकाणी नेण्यात आलं, आम्ही तीन दिवस तिथल्या हॉटेलमध्ये होतो. आम्ही तिथली भयंकर परिस्थिती पाहिली आहे. मरिया प्रमाणेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थी विद्यार्थ्यांनाही हेच अनुभव आहे. मरीया म्हणाली मला तर वाटलं होतं की मी भारतात परत जाऊ शकणार नाही. खरंतर तेहरान हे शिक्षणासाठी उत्तम ठिकाण आहे. तिथे जाऊन मला पुढे शिक्षण घ्यायला नक्कीच आवडेल पण आता काय होतंय ते माहीत नाही.
“आम्ही भारतात जिवंत परत जाऊ असं आम्हाला कुणालाही वाटलं नाही. तेहरान हे शिक्षणासाठी उत्तम ठिकाण आहे. मात्र ज्या पद्धतीने हल्ले सुरु झाले आता तिथे काय होईल हे सांगता येणार नाही. तिथली परिस्थिती भयंकर आहे.“
मरिया मंझूर, इराणमध्ये शिक्षण घेणारी भारतीय विद्यार्थिनी
आमच्या डोळ्यांसमोर हल्ले होत होते-फातिमा अलवारी
फातिमा अलवारी या २२ वर्षीय मुलीने सांगितलं आमच्या डोळ्यांसमोर हल्ले होत होते. सगळं काही क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत होतं. दुतावासाने आम्हाला शनिवारी त्या ठिकाणाहून सोडवलं. आम्हीही मशह्हाद या ठिकाणी हॉटेलमध्ये होतो. मी त्या संघर्षातून आणि युद्धस्थितीतून भारतात परतले आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. फातिमा दिल्लीत आली आणि त्यानंतर ती श्रीनगरला गेली आहे.

निखत बेगम यांनी त्यांच्या मुलीबाबत काय भाष्य केलं?
दरम्यान दिल्ली विमानतळावर विविध प्रवासी येत होतेच. निखत बेगम या दिल्लीच्या साकेत भागातील रहिवासी आहेत. त्या म्हणाल्या त्यांची मुलगी सादिया शेख २२ वर्षांची आहे. ती एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला होती. तिने सप्टेंबर महिन्यात दिल्लीला यायचं म्हणून तिकिटंही बुक केली होती. मात्र त्याआधीच ही भीषण परिस्थिती उद्भवली. हल्ले सुरु झाल्यानंतर मी तिला फोन केला. त्यावेळी तिने सांगितलं की मिसाईलचे हल्ले ती पाहू शकते आहे. मी खूपच घाबरुन गेले होते. आता ती सुखरुप घरी परतली याचा मला आनंद आहे.
मुलीने परिस्थिती सांगितली तेव्हा काळजाचं पाणी झालं-सोहेल कादरी
सोहेल कादरी यांनीही त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले माझी मुलगी एमबीबीएस करते आहे तर माझा मुलगा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला आहे. इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्समध्ये हे दोघंही शिकत होते. पण आता अशी परिस्थिती उद्भवल्याने त्यांना भारतात यावं लागलं. तुम्हीच विचार करा जर इराण आणि इस्रायल यांच्यात हल्ले सुरु झाले तर ज्यांची मुलं तिथे शिकायला गेली आहेत त्यांच्या काळजाचं पाणी कसं झालं असेल. माझ्या मुलीने जेव्हा मला हे सांगितलं की हल्ला झाला तेव्हा मी तिसऱ्या मजल्यावरुन तळ मजल्यावर पळाले तेव्हा माझ्या मनाला खूपच वेदना झाल्या. कुणीतरी आपल्या काळजावर कट्यारी चालवत आहे अशी ती भावना होती.
“माझ्या मुलीने जेव्हा मला हे सांगितलं की हल्ला झाला तेव्हा मी तिसऱ्या मजल्यावरुन तळ मजल्यावर पळाले तेव्हा माझ्या मनाला खूपच वेदना झाल्या. कुणीतरी आपल्या काळजावर कट्यारी चालवत आहे अशी ती भावना होती.”
सोहेल कादरी, इराणमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वडील
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान एक बरं झालं की तिथे जे दुतावासातले अधिकारी होते त्यांनी सहकार्य केलं. मात्र तरीही तिथे जी परिस्थिती आहे ती सुधारलेली नाही. तिथे अजूनही गोंधळ आणि संभ्रम आहे असंही सोहेल कादरी यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.