दुबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘विनाअट संपूर्ण शरणगती’साठी दिलेला सल्ला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी स्पष्ट शब्दांत धधुडकावून लावला. उलट, इस्रायलबरोबर सुरू असलेल्या युद्धात कुठलाही लष्करी सहभाग अमेरिकेचे कधीही भरून न येणारे नुकसान करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
ट्रम्प यांनी मंगळवारी शरण येण्याबाबत भाष्य केल्यानंतर इराणच्या सरकारी वाहिनीवरून खामेनी यांचा संदेश बुधवारी प्रक्षेपित करण्यात आला. यामध्ये त्यांनी ट्रम्प यांचा विनाअट शरण येण्याच्या प्रस्तावाची खिल्ली उडविली. ‘इराण शरण येणार नाही. ज्या बुद्धिमान लोकांना इराण, इथले लोक आणि इराणचा इतिहास माहीत आहे, ते अशा भाषेत बोलणार नाहीत. इराण शरण येणाऱ्यातला नाही. अमेरिकेला हे माहीत हवे, की अमेरिकेचा कुठलाही लष्करी सहभाग त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान करणारा ठरेल,’ अशा शब्दांत खामेनी यांनी अमेरिकेला इशारा दिला.
हल्लेप्रतिहल्ले सुरूच
इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलने मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे जोरदार हवाई हल्ले केले. युरेनियम सेंट्रिफ्युजेस आणि क्षेपणास्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्य तयार करणारे केंद्र लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. त्याच वेळी इराणनेही इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली. यातील १० क्षेपणास्त्रे भेदण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात इराणमध्ये ५८५ जणांचा मृत्यू झाला असून १३०० जण जखमी झाल्याचे वॉशिंग्टनमधील मानवी हक्क गटाने म्हटले आहे. इस्रायलमध्ये २४ जणांचा बळी गेला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.