पीटीआय, नवी दिल्ली

अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी इराणने अपवाद करून भारतासाठी आपली हवाई हद्द खुली केली आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंधू’अंतर्गत इराणमध्ये विविध ठिकाणी अडकलेले एक हजार विद्यार्थी या आठवडाअखेर भारतामध्ये परत येणार आहेत. त्यातील पहिले विमान शुक्रवारी रात्री, तर उर्वरित दोन विमाने शनिवारी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.

‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांना घेऊन भारताचे पहिले विमान दिल्लीमध्ये उतरले होते. मात्र, हे विद्यार्थी दूतावासाच्या समन्वयाने इराणमधून अर्मेनियाला गेले होते. तेथून त्यांना भारतात आणले होते. भारतात परत आणलेल्या ११० विद्यार्थ्यांमध्ये ९० विद्यार्थी जम्मू-काश्मीरमधील होते. इराणवर इस्रायलचा हल्ला झाल्यानंतर हे विद्यार्थी इराणमधून अर्मेनियाला रवाना झाले होते. इराणमधील अनुभव भीषण असल्याचा अनुभव खलिफ या विद्यार्थ्याने सांगितला. इराणमध्ये आणखी विद्यार्थी अडकले असून, त्यांनाही भारतात आणले जाईल, अशी आशा त्याने व्यक्त केली होती.

दरम्यान, इस्रायलने आपल्याविरोधात केलेल्या लष्करी कारवाईचा भारताने निषेध करावा अशी अपेक्षा असल्याचे इराणच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने शुक्रवारी दिल्लीत सांगितले. इराणी दुतावासातील उपप्रमुख मोहम्मद जावेद हुसेनी म्हणाले की, इस्रायलच्या कारवाया आंतरराष्ट्रीय कायद्याविरोधात आहेत. तसेच पाकिस्तान इराणच्या हितसंबंधांचे नुकसान होईल अशी कोणतीही कृती करणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हवाई, जमीन, समुद्रामार्गे परदेशी नागरिकांची सुटका

● भारतासह जगभरातील अनेक देशांनी आपापल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हवाई, जमीन, समुद्री मार्गांचा वापर केला आहे.

● स्लोव्हेनिया, अमेरिका, बेल्जियम, अल्बेनिया, कोसोवो आणि रोमानियामधील ५९ नागरिकांसह ८९ बल्गेरियन नागरिकांना इस्रायलमधून बल्गेरियाची राजधानी सोफियात हलवण्यात आले.

● चीनने इराणमधून १,६०० हून अधिक तसेच इस्रायलमधूनही अनेक नागरिकांना बाहेर काढले. युरोपियन महासंघाने जॉर्डन आणि इजिप्तमार्गे इस्रायलमधून सुमारे ४०० लोकांची सुटका केली.

● जर्मनीने बुधवारी एका विशेष विमानाने १७१ नागरिकांना अम्मानमधून बाहेर काढले. गुरुवारी आणखी १७४ लोक तेथून परतले. या आठवडाअखेरीस आणखी एक विमान पाठविण्याचे नियोजन आहे.

अमेरिकेबरोबर चर्चा सुरू करण्यासाठी इराणला पुरेसा वेळ देऊ आणि या संघर्षात अमेरिकी लष्कराच्या थेट सहभागाबाबत दोन आठवड्यांत निर्णय घेऊ.– डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेला या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. मात्र, इस्रायलचे आक्रमण पूर्ण थांबल्याखेरीज कुठलीही चर्चा होणार नाही. आमचा स्वसंरक्षणार्थ लढा सुरू आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. अब्बास अराघाचीपरराष्ट्रमंत्री, इराण