Iran VS Donald Trump Nuclear Deal : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (३० मार्च) इराणला थेट धमकी दिली होती. येत्या काही दिवसांत अमेरिकेबरोबर अणू करार करा अन्यथा बॉम्बहल्ले आणि शुल्कवाढीला सामोरे जा असा कठोर इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला होता. मात्र, इराणने ट्रम्प यांच्या धमकीला जुमानलेलं नाही. उलट इराणी सैन्याने त्यांच्या देशावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी क्षेपणास्त्रे सज्ज केली आहेत. तेहरान टाइम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

इराणी सैन्याने देशभरात भूमिगत तळ बनवून तिथे ठेवलेली क्षेपणास्त्रे प्रक्षेपणासाठी सज्ज केली आहेत. हे भूमिगत तळ देशावरील कोणत्याही मोठ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी तयार केले आहेत. दुसऱ्या बाजूला इराणच्या सर्वोच्च नेत्यानेही बदला घेण्याची धमकी दिली आहे.

अमेरिकेच्या ‘अरे’ला इराणकडून ‘का रे’

इराणने याआधीही अमेरिकेच्या ‘अरे’ला ‘का रे’ केलं होतं. गेल्या आठवड्यात इराणने अमेरिकेशी थेट चर्चेसही नकार दिला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प एनबीसीशी बातचीत करत असताना म्हणाले, “अमेरिकन व इराणी अधिकारी चर्चा करत आहेत.” मात्र त्यावेळी ट्रम्प यांनी सविस्तर बोलणं टाळलं होतं. ट्रम्प म्हणाले, “इराण सहमत झाला नाही तर मोठे बॉम्बस्फोट होतील. हा बॉम्बस्फोट असा असेल की त्यांनी (इराणने) आजवर पाहिला नसेल.”

“इराणने करार केला नाही, तर, बॉम्ब हल्ले होतील. त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसतील असे बॉम्बहल्ले होतील. तसेच आम्ही त्यांच्यावर दुप्पट कर लादू. मी चार वर्षांपूर्वी असं केलं होतं. ” असे ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराणचे सर्वोच्च नेते खोमेनेई यांचं चोख प्रत्युत्तर

इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खोमेनेई यांनी ट्रम्प यांच्या धमकीला सोमवारी उत्तर दिलं. ते म्हणाले, आमेरिकेने बॉम्ब हल्ले केले तर त्यांना तितक्याच मोठ्या बॉम्ब वर्षावाला, प्रत्युत्तराला सामोरं जावं लागेल. आमचं पूर्वीपासूनच अमेरिका व इस्रायलशी शत्रुत्व आहे. ते केवळ हल्ल्याची धमकी देतात. परंतु, अशा हल्ल्याची आम्हाला शक्यता वाटत नाही. तरीदेखील त्यांना असा काही प्रयत्न केला, खोडसाळपणा केलाच तर नक्कीच त्यांना चोख प्रत्युत्तर मिळले. अमेरिकेने अनेकदा इराणमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी तसा प्रयत्न केला तर इराणी जनता स्वतः त्यास सामोरी जाईल.