US Airstrikes Iran Updates : इस्रायल-इराणमधील संघर्ष वाढला आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. मात्र, या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या संदर्भातील माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली आहे.

अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. तसेच इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेने हल्ला केल्यानंतर आता इराणची पहिली प्रतिक्रया समोर आली आहे. अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याचा इशारा इराणने दिला आहे.

अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रावर हवाई हल्ले केल्याबद्दल इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेचा निषेध केला आहे. तसेच हे आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे चार्टर आणि एनपीटी कराराचं गंभीर उल्लंघन असल्याचं मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी म्हटलं आहे. इराणच्या शांततापूर्ण अणु कार्यक्रमावरील हल्ले अपमानकारक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणचा गंभीर इशारा

इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य असलेल्या अमेरिकेवर शांततापूर्ण अणु प्रकल्पांना लक्ष्य करून गुन्हेगारी वर्तन केल्याचा आरोप सय्यद अब्बास अराक्ची यांनी केला आहे. सय्यद अब्बास अराक्ची यांनी म्हटलं की, “आज सकाळच्या घटना अत्यंत भयानक आहेत आणि त्यांचे कायमचे परिणाम होतील. संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक सदस्याने या अत्यंत धोकादायक, बेकायदेशीर आणि गुन्हेगारी वर्तनाबद्दल सावध असलं पाहिजे”, असं इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणने स्वसंरक्षणाचा अधिकार वापरण्यासाठी सर्व पर्याय राखून ठेवले असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, “इराणवर हवाई हल्ला करण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मी अनेकदा म्हणतो की शांतता हवी आहे. इतिहासात नोंद होईल की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवटीला आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्रांना नाकारण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाने आज इतिहासाचा एक केंद्रबिंदू निर्माण केला आहे, जो मध्य पूर्व आणि त्यापलीकडे समृद्धी आणि शांतीच्या भविष्याकडे नेण्यास मदत करू शकतो”, असं बेंजामिन बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं.