मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेली तब्बल  १५ वर्षे उपोषण करणाऱ्या मानवी हक्क कार्यकर्त्यां इरोम शर्मिला चानू यांनी मंगळवारी आपण उपोषण सोडणार असल्याचे जाहीर केले. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मी उपोषण सोडत असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसेच अफ्स्पाचा प्रश्न सोडविण्यासाठी आगामी मणिपूर विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचेही शर्मिला इरोम यांनी सांगितले. पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इरोम शर्मिला येत्या ९ ऑगस्टला उपोषण सोडतील. त्या गेल्या १५ वर्षांपासून मणिपूरमधील अफ्स्पा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण करत आहेत. मात्र, या काळात त्यांना इम्फाळ येथील सरकारी रूग्णालयात जबरदस्तीने दाखल करून  नाकातून नळीवाटे अन्न देण्यात येत होते. त्या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत.
लष्करी दडपशाहीला आळा
१९५८ पासून मणिपूरमध्ये अफ्स्पा लागू आहे. सीमावर्ती भागातील अशांततेचे वातावरण नियंत्रणाखाली राहावे म्हणून लष्कराला अधिकार देणारा हा कायदा १९५८ पासून नागालँड व मणिपूरमध्ये (इम्फाळ वगळता) लागू करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये लष्करी कारवाईत गेल्या २० वर्षांत १५२८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका १२ वर्षांच्या मुलाचा तर एका कारवाईत राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या तरुणाचाही समावेश होता. या प्रकरणांनंतर आफ्स्पाच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले आहे. याबाबतच्या इरोम चानू शर्मिला यांच्या उपोषणाची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे. यामुळे मानवी हक्कांची पायमल्ली केल्याबद्दल भारत सरकारवर टीकाही झाली आहे.
४२ वर्षीय इरोम शर्मिला गेली सुमारे १४ वर्षे अन्नसत्याग्रह करीत आहेत. २००० साली इम्फाळ विमानतळाजवळ आसाम रायफल्स या निमलष्करी दलाने एका चकमकीत १० अतिरेक्यांना ठार केले होते. ही चकमक बनावट असल्याचा आरोप करून शर्मिला यांनी हा अन्नसत्याग्रह सुरू केला होता, परंतु पोलिसांनी हा ‘आत्महत्येचा प्रयत्न’ असल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक केली होती. त्यांना एका रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्या खोलीचाच तुरुंग करण्यात आला आहे. त्यांना नळीद्वारे नाकातून अन्नपदार्थ दिले जात आहेत. ‘आम्र्ड फोर्सेस (स्पेशल पॉवर्स) अॅक्ट-१९५८’ या कायद्याखाली त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, २०१४ मध्ये स्थानिक न्यायालयाने इरोम यांची आत्महत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती.
भुताचे घर!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irom sharmila to break 15 year long fast will contest manipur elections
First published on: 26-07-2016 at 15:30 IST