Haridwar Pregnant Woman: डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी यांना समाजात मानाचं आणि देवदूताचं स्थान दिलं जातं. पण उत्तराखंडच्या हरिद्वार येथे आरोग्य कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला. एका गर्भवती महिलेला रुग्णालयात प्रवेश नाकारल्यामुळं तिला रुग्णालयातील फरशीवर बाळाला जन्म द्यावा लागला. विशेष म्हणजे, त्यावेळी नर्स तिथे उभ्या होत्या आणि गर्भवतीला हिणवत होत्या, असा दावा गर्भवतीच्या नातेवाईकांनी केला. अतिशय हिणकस अशी वृत्ती दाखवल्यामुळे या रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त करणात येत आहे.

सदर गर्भवती महिला गरीब परिवारातून येते. मंगळवारी रात्री या महिलेला रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आला. महिला रुग्णाच्या कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, ड्युटीवर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी महिलेवर उपचार करण्यास नकार दिला. या रुग्णालयात प्रसूती होत नाही, असे ते म्हणाले.

रात्री ९.३० वाजता रुग्णालयात आलेली महिला उपचाराविनाच जमिनीवर वेदनेने तडफडत होती. मात्र नर्स किंवा डॉक्टरांनी तिला सहानुभूती दाखवली नाही. अखेर रात्री १.३० वाजता रुग्णालयाच्या आवारात जमिनीवरच तिची प्रसूती झाली. त्यानंतरही तिला कोणतीही वैद्यकीय मदत देण्यात आली नाही.

दुसऱ्या दिवशी रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेच्या एका नातेवाईकाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही जेव्हा रुग्णालयात आलो तेव्हा गर्भवती महिलेनं सांगितलं की तिला कुणीही बेडवर झोपण्याची परवानगी दिली नाही.

नर्स म्हणाली मजा आली का?

गर्भवती महिलेच्या नातेवाईकानं पुढं म्हटलं, “प्रसूतीनंतर तिथं उभ्या असलेल्या दोन नर्सपैकी एकीने म्हटलं की, मजा आली का? अजून देशील मुलांना जन्म?” या घटनेवर संताप व्यक्त करताना नातेवाईकानं म्हटलं, असं कुणी बोलतं का? जर बाळाला काही झालं असतं तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती? चक्क जमिनीवर प्रसूती झाली, कोणत्याही रुग्णाला अशी वागणूक मिळू नये.

या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला जमिनीवर वेदनेने विव्हळत असताना दिसून येत आहे. तिच्याबरोबर असलेली एक वृद्ध नातेवाईक तिला आधार देत आहे. तर आजूबाजूला मदतीसाठी एकही आरोग्य कर्मचारी आला नाही.