पश्चिम बंगालच्या पश्चिम वर्धमान जिह्यातील दुर्गापूर येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर शुक्रवारी रात्री तिच्याच महाविद्यालयाच्या संकुलात बलात्कार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०२४ मध्ये घडलेल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि यावर्षी विधी महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा महाविद्यालयातच अशाप्रकारची घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आर. जी. कर महाविद्यालयातील पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

आर.जी. कर रुग्णालय पीडितेचे वडील काय म्हणाले?

आर.जी. कर रुग्णालयात एका डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात घडली होती. या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया दिली, “आज पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. सुरक्षित राज्याचं हे उदाहरण आहे का? ज्या मुलीवर बलात्कार झाला ती मुलगी तिचं करिअर करायला आपल्या राज्यात आली होती. तिने डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्यासाठी आपल्या राज्यातल्या महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. मात्र तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. ती जिवंत आहे पण तिला किती मोठा धक्का बसला असेल हे मी समजू शकतो.” असं म्हणत पीडितेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये काय घडलंं होतं?

कोलकाता येथील आर.जी.कर महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तसंच या रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी पीडितेच्या सहकाऱ्यांनी संप पुकारला होता आणि या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपीला अटक केली. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा एमबीबीएसला शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार झाला आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगाल पुन्हा सुन्न झाला आहे. या प्रकरणानंतर आर.जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालय बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी हे सुरक्षित राज्य आहे का? असा प्रश्न विचारत प्रतिक्रिया दिली आहे.

कोलकाता येथील घटनेबाबत पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुळची ओडिशाची राहणारी आहे. शुक्रवारी रात्री ती तिच्या मित्रासह संकुलाच्या बाहेर आली होती. तेव्हा तिला काही जणांनी संकुलाच्या मागे असलेल्या झुडुपात ओढत नेले आणि लैंगिक अत्याचार केला. पोलिसांना याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडितेला रुग्णालयात दाखल केले. पीडितेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.राजधानी कोलकातापासून १७० किमी अंतरावर असलेले दुर्गापूर हे पश्चिम बंगालमधील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र आहे. अशा महत्त्वाच्या शहरात ही घटना घडल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.