पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार ‘आयएसआय’च्या एजंट असल्याच्या सुनंदा थरूर यांच्या ट्विटमुळे गुप्तहेर विभाग सक्रिय झाला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कथित भागीदारीमुळे तीन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्रीपद गमावल्यानंतरही शशी थरूर यांना केवळ गांधी कुटुंबीय व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या वरदहस्तामुळे दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले. मात्र, सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे थरूर यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले आहे. शिवाय, शशी थरूर यांच्या भरवशावर केरळमध्ये लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या काँग्रेसचे मनसुबे उद्ध्वस्त झाले आहेत.
शुक्रवारी काँग्रेस अधिवेशनात थरूर पूर्णवेळ होते. एरवी, नेत्यांशी हसत-खिदळत बोलणारे थरूर काहीसे अस्वस्थ होते. राहुल गांधी यांच्या आक्रमक भाषणाला थरूर यांनी दिलखुलास दाद दिली होती. अभिनेत्री सुचित्रा सेन यांच्या निधनावर ट्विटरवरून शोकही व्यक्त केला होता. दिवसभर काँग्रेस अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या थरूर यांनाच नव्हे तर सर्वच काँग्रेस नेत्यांना सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे धक्का बसला आहे. ज्या ट्विटरमुळे थरूर यांनी मंत्रिपद गमावले होते; त्याच ट्विटरवरील ‘पती, पत्नी व वो’ वादाची अखेर सुनंदा यांच्या मृत्यूमुळे झाली. ट्विटर माझी सवत असल्याचे सुनंदा कितीतरी वेळा सांगायच्या.
 पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप सुनंदा यांनी केला होता. त्या पाकिस्तानी गुप्तहेर विभागाच्या हस्तक असल्याच्या सुनंदा यांच्या ट्विटमुळे गुप्तहेर विभाग गेल्या दोन दिवसांपासून सक्रिय झाला होता. थरूर दाम्पत्य व मेहर तरार यांच्या संबंधात ‘आयएसआय’चा संदर्भ आल्याने गुप्तहेर विभाग या प्रकरणी सक्रिय झाला आहे.
थरुर-तरार यांच्या कथित संबंधांचीही चौकशी?
कधी काळी संयुक्त राष्ट्र संघात बडय़ा पदावर असलेल्या थरूर यांचे आंतरराष्ट्रीय संबंध, भारतीय राजकारणात महत्त्वाचे स्थान, शिवाय गांधी कुटुंबीयांशी जवळीक असल्याने शशी थरूर व मेहर तरार यांच्या कथित संबंधांची गुप्तहेर खात्याने चौकशी सुरू केली आहे. त्यातच सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे न झाल्याच्या प्राथमिक निष्कर्षांमुळे गुप्तहेर विभागाची चिंता वाढली आहे.