काही भारतीय युवक हे इसिस या दहशतवादी गटाकडे आकर्षित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे मत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. सरकारने हे आव्हान गांभीर्याने घेतले आहे, असे ते म्हणाले.
पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षकांच्या परिषदेत ते बोलत होते. ‘पाकिस्तानातील अतिरेकी शक्ती भारताला अस्थिर करीत आहेत, वेगवेगळ्या युक्त्या वापरून भारताला हानी पोहोचवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत,’ असा इशारा देतानाच ‘आम्ही ते हाणून पाडू’, असा आत्मविश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईतील युवकांनी इराकमधून घेतलेले इसिसचे प्रशिक्षण या घटनेवर त्यांनी विस्तृत भाष्य केले. हा गट सीरिया व इराकमध्ये जन्माला आला असला तरी भारतीय उपखंड त्यांच्या धोक्यापासून अस्पर्शित राहू शकलेला नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. काही भारतीय युवकांना ‘इसिस’चे वाटणारे आकर्षण धोकादायक आहे, असे ते म्हणाले. मजीद याला मुंबईत आल्यानंतर अटक करण्यात आली आहे पण त्याची छळवणूक केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. अल कायदाने ‘कायदा उल जेहाद’ ही संघटना भारतीय उपखंडात स्थापन करण्याचे ठरवले आहे, असे ते म्हणाले.