Iran-Israel conflict Latest Updates: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने बुधवारी इराणवर शक्तिशाली हवाई हल्ले केल्याने तेहरान आणि त्याच्या आसपासच्या अणु प्रकल्पातील दोन सेंट्रिफ्यूज उत्पादन सुविधांसह प्रमुख लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. सहा दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष इस्रायलच्या या ताज्या हल्ल्यांमुळे आणखी तीव्र झाला असून, यामुळे प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे.
“इस्रायली लष्कराने काल रात्री इराणच्या सेंट्रिफ्यूज उत्पादन स्थळावर आणि अनेक शस्त्रास्त्र उत्पादन स्थळांवर हल्ला केला,” असे इस्रायलच्या सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे. या ऑपरेशनमध्ये ५० हून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. “गुप्तचर शाखेच्या अचूक मार्गदर्शनाखाली, गेल्या काही तासांत ५० हून अधिक हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी तेहरान परिसरातील लष्करी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत”, असे त्यामध्ये पुढे म्हटले आहे.
इस्रायली संरक्षण दलाने म्हटले आहे की, “ज्या सेंट्रिफ्यूज साइटवर हल्ला केला, त्या सेंट्रिफ्यूजमुळे इराणच्या अण्वस्त्रांसाठी युरेनियम समृद्धीकरण क्षमतेला गती मिळणार होती. इराण सरकार अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी बनवलेल्या युरेनियमचे समृद्धीकरण करत आहे.”
सेंट्रिफ्यूज म्हणजे काय?
नाजूक आणि हाय-स्पीड स्पिनिंग डिव्हाइसेस असलेले सेंट्रिफ्यूज युरेनियम समृद्ध करण्यासाठी वापरले जातात. या उत्पादन सुविधांना नुकसान पोहोचवल्याने इराणच्या भविष्यातील युरेनियम समृद्धीकरण वाढविण्याच्या क्षमतेला गंभीरपणे बाधा पोहोचू शकते.
इस्रायली हल्ल्यात नुकसान झाले असले तरी, इराणच्या कार्यरत समृद्धीकरण सुविधा अंशतः कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनुसार, इराणने अलीकडेच १६६.६ किलो ६०% समृद्ध युरेनियम तयार केले आहे, त्यामध्ये आणखी शुद्धीकरण केल्यास ते चार अणुबॉम्बसाठी पुरेसे आहे.
इस्रायलने लक्ष केलेल्या इतर ठिकाणांमध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी घटक तयार करणाऱ्या कारखान्यांचा समावेश आहे.
बुधवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याची पूर्ण माहिती इराणने अद्याप दिलेली नाही, परंतु तेहरानमधील रहिवाशांनी स्फोटांची मालिका झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यांमुळे परिसर हादरला असून, रात्रीच्या अंधारात अनेकांना पळून जावे लागले. इराण-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून इराणमध्ये अंदाजे ५८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात क्रॉसफायरमध्ये अडकलेल्या नागरिकांचाही समावेश आहे.