एपी, कैरो
गाझा युद्धाला सुरुवात होऊन दोन वर्षे पूर्ण होत असताना इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामाची बोलणी सुरू आहेत. युद्धविरामाची चर्चा दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली. युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्यातील बहुतांश मुद्द्यांवर दोन्ही बाजूंचे एकमत झाल्याची माहिती आहे. या संघर्षात आतापर्यंत इस्रायली आणि पॅलेस्टिनी मिळून ६८ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात २० कलमी शांततेचा प्रस्ताव जाहीर केला. त्याच्या चौकटीत शर्म अल शेख येथे उभयतांत चर्चा होत आहे. इजिप्तमधील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की युद्धविरामासाठी सोमवारी झालेल्या चर्चेत युद्धविरामासाठीच्या पहिल्या टप्प्यासाठी बहुतांश मुद्द्यावर इस्रायल आणि हमास यांच्यात एकमत झाले आहे. यामध्ये ओलिसांची सुटका आणि युद्धविरामाचाही समावेश आहे.

‘युद्धविरामासाठी ही चांगली संधी’

दरम्यान, ट्रम्प यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना युद्धविरामासाठी ही चांगली संधी असल्याचे म्हटले आहे. गाझा युद्धाच्या पलीकडे जाऊन दीर्घकालीन करार करण्याचीही ही संधी असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘गाझा हा खरेच मोठा करार आहे. पण, पश्चिम आशियात यामुळे खरेच शांतता नांदेल,’ असे ट्रम्प म्हणाले.

इस्रायलमध्ये मृतांना आदरांजली

हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केला होता. यात इस्रायलमधील १२०० जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे २५१ जणांना हमासने पळवून नेले होते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना इस्रायलने मंगळवारी आदरांजली वाहिली.

अमेरिकेचे इस्रायलला २१.७ अब्ज डॉलर?

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेने इस्रायलला गाझा युद्ध सुरू झाल्यापासून दोन वर्षांत २१.७ अब्ज डॉलरची लष्करी मदत दिली आहे. सार्वजनिक उपलब्ध असलेल्या माहितीतून संकलित केलेल्या एका अहवालात ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. ब्राउन विद्यापीठात ‘कॉस्ट्स ऑफ वॉर’ प्रकल्पांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, या मदतीखेरीज आणखी सुमारे १० अब्ज अमेरिकी डॉलर सुरक्षेसाठी साह्य दिले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर अधिकृत टिप्पणी केलेली नाही.

हमासचे दोन वर्षांपूर्वीचे दहशतवादी कृत्य आम्ही कधीही विसरणार नाही. ओलिसांची सुटका आणि युद्धविराम आता दृष्टिपथात आहे. – उर्सुला वॉन दर लियेन, अध्यक्ष, युरोपीय कमिशन

दोन वर्षांपूर्वीच्या हल्ल्याच्या वेदना आजही आहेत. ओलिसांची सुटका आणि युद्धविराम तातडीने व्हावा. – इमॅन्युएल माक्राँ, अध्यक्ष, फ्रान्स

हमासच्या हल्ल्यात निरपराध इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. ७ ऑक्टोबर हा इतिहासातील एक काळा दिवस ठरला आहे. – जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली

त्या दिवशी आम्ही जे पाहिले, ते आजही विसरलेलो नाही. ज्यू लोकांवरील तो निर्घृण हल्ला होता. आताचा युद्धविराम दीर्घकालीन शांततेसाठी आणि द्विराष्ट्र सिद्धांतानुसार उपायाच्या दिशेने जाणारा ठरावा. – कीर स्टार्मन, पंतप्रधान, ब्रिटन