Israel Hamas Ceasefire news Latest Update : गेल्या १५ महिन्यांपासून इस्रायल व हमासमधील युद्धामुळे मध्य-पूर्व आशियात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. सुरुवातीला अनेक देशांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात कोणत्याही देशाला अथवा नेत्याला यश मिळालं नाही. दुसऱ्या बाजूला इराण, लेबनान, हेझबोला (लेबनानमधील दहशतवादी संघटना) व सीरियासारख्या देशांनी या युद्धात उडी घेतल्यामुळे या युद्धाची व्यापकता व दाहकता आणखी वाढली. यामुळे संपूर्ण आशिया खंडात तणाव निर्माण झाला. अखेर आता हे युद्ध थांबेल असं दिसतंय. हे युद्ध थांबवण्यासाठी व हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसंबंधीच्या सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, इस्रायलच्या संरक्षण विभागाने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी सकाळी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे की इस्रायली सुरक्षा मंत्रिमंडळाने ओलिसांची सुटका आणि हमाससह युद्धविरामाच्या करारास मान्यता दिली आहे. तसेच सरकारला हा करार स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.

या युद्धविरामामुळे गाझापट्टीत हमास व इस्रायलमध्ये गेल्या १५ महिन्यांपासून चालू असलेलं युद्ध थांबेल. त्याचबरोबर अनेक ओलिसांची सुटका केली जाईल. इस्रायल व हमासमधील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावणाऱ्या अमेरिकेने व कतारने बुधवारीच युद्धविराम जाहीर केला होता. मात्र या करारावर सहमती होण्यास थोडा उशीर झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, “सामंजस्य करार पुढे नेत असताना अखेरच्या क्षणी हमासमुळे काही अडचणी आल्या. मात्र आम्ही प्रयत्नांनी हा करार पूर्ण केला”.

हे ही वाचा >> Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामंजस्य कराराला अर्थमंत्र्यांचा विरोध

युद्धविरामासंबंधीचा सामंज्यस करार आता इस्रायलच्या केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. या कराराला कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. नेतन्याहू सरकार या करारावर शिक्कामोर्तब करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रविवारपासून सीमाभागात युद्धविराम घोषित होऊ शकतो. मात्र, इस्रायलमधील टोकाची उजवी विचारसरणी असलेल्या उजव्या आघाडीतील पक्ष व नेत्यांनी या कराराचा कडाडून विरोध केला आहे. इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच व राष्ट्रीय संरक्षण मंत्री इटामार बेनगुइरे यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाच्या युद्धविराम कराराच्या विरोधात मतदान केलं आहे. परंतु, ते अल्पमतात असल्यामुळे नेतन्याहू सरकारला हा करार पुढे नेता आला.