Israel Air Strike on Iran Killed top Army Officers : मध्य-पूर्व आशियात मोठा तणाव निर्माण झाला आहे. इस्रायली लष्कराने शुक्रवारी पहाटे ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करून इराणवर हवाई हल्ला केला. पाठोपाठ इराणनेही रात्री इस्रायलवर १५० क्षेपणास्रे डागून जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, इस्रायल हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्याने इराणी लष्कराचं कंबरडं मोडलं आहे. कारण, इस्रायली हवाई हल्ल्यात इराणचे अनेक मोठे लष्करी अधिकारी व अणुशास्त्रज्ञ ठार झाले आहेत.

इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रामचे प्रमुख आमिर अली हाजीजादेह यांचा मृत्यू झाला आहे. हाजीजादेह यांच्या मृत्यूने इराणी लष्कराला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी इराणने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्या हल्ल्याची रणनिती हाजीजादेह यांनी आखली होती.

हाजीजादेह इराणी लष्करी धोरणाचा चेहरा बनले होते

इस्रायलने गेल्या वर्षी इराणमध्ये हवाई हल्ला करून हेझबोलाचा नेता हसन नसरल्लाह, त्याचे सहकारी व हेझबोलाच्या इतर कमांडर्सना ठार केलं होतं. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलविरोधात मोहीम उघडली होती. त्याचं नेतृत्व हाजीजादेह यांनी केलं होतं. हाजीजादेह यांनी इस्रायलवर मोठ्या क्षेपणास्र हल्ल्याची योजना आखली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांच्या आदेशानंतर इराणी लष्कराने त्यावर अंमलबजावणी केली आणि इराणने इस्रायलवर सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर हाजीजादेह यांच्याकडे इराणी लष्करी धोरणाचा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. मात्र आता इस्रायलने हाजीजादेह यांचा काटा काढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या तीन मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू

आमिर अली हाजीजादेह यांनी अनेकवेळा इस्रायलला धमकावलं होतं. त्यांच्या प्रत्येक कारवाईला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल अशी वक्तव्ये हाजीजादेह यांनी केली होती. मात्र, आता इस्रायलने त्यांच्या धमक्या व क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या एलिट रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे कमांडर इन-चीफ जनरल हुसेन सलामी देखील ठार झाले आहेत. तर,तेहरानजवळच्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाला आहे. लष्करी हुद्द्यानुसार ते दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते. तसेच जनरल गुलाम अली रशीद हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. खातम अल-अबिया राज्य मुख्यालयाचे ते प्रमुख होते.