Donald Trump On Israel Iran Conflict Updates : इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट केलं आहे. दुसरीकडे इराणनेही इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले आहेत. तसेच इस्त्रायलने इराणच्या सरकारी टीव्ही मुख्यालयासह तेल डेपो लक्ष्य करत मोठे हवाई हल्ले केल्यामुळे संघर्ष वाढला आहे. इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षाचा फटका आता जगातील अनेक देशांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा देखील खात्मा झाला आहे. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, इराण आणि इस्त्रायलमधील संघर्ष वाढल्यामुळे भारतासह अमेरिकेने इराणमधील आपल्या नागरिकांना तेहरान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन्ही देशातील तणाव वाढलेला असताना अमेरिकेकडून या संघर्षाला इराणलाच जबाबदार ठरवण्यात आलं आहे. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक मोठं विधान समोर आलं आहे. ‘आता आमचं इराणवरील आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे’, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “आता आमचं इराणवरील आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे. इराणकडे चांगले स्काय ट्रॅकर्स आणि इतर संरक्षणात्मक उपकरणे भरपूर होती. पण त्याची तुलना अमेरिकेने निर्माण केलेल्या गोष्टींशी होऊ शकत नाही. अमेरिकेपेक्षा हे कोणीही चांगलं करू शकत नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टनला परतले होते

जी-७ परिषदेसाठी गेलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अचानक वेळेआधीच वॉशिंग्टनला परतल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. इस्रायल-इराण संघर्षावर जी-७ परिषदेत चर्चा होणं अपेक्षित असताना डोनाल्ड ट्रम्प अचानक वॉशिंग्टनला का चालले असावेत? यावर तर्क-वितर्क चालू झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना लक्ष्य करताना ट्रम्प यांनी आपण इराण-इस्रायल संघर्षातील मुद्द्यांवर काम करण्यासाठी वॉशिंग्टनला जात नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.

‘शस्त्रसंधीपेक्षा अधिक चांगला शेवट हवाय’ : ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षाबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता फक्त शस्त्रसंधी आपल्याला अपेक्षित नसल्याचं स्पष्ट केलं. “आम्हाला या संघर्षात फक्त शस्त्रसंधीपेक्षा अधिक चांगला शेवट हवा आहे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अधिक चांगला शेवट म्हणजे काय? अशी विचारणा केली असता “याचा अर्थ संघर्षावर पूर्णविराम. एक खराखुरा शेवट. फक्त तात्पुरती शस्त्रसंधी नको. संपूर्ण शेवट”, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराणने इंटरनेट कनेक्टेड डिव्हाईस वापरण्यास घातली बंदी

काही महिन्यांपूर्वी लेबनॉन हादरलं होतं. लेबनॉनमध्ये अचानक पेजर आणि वॉकीटॉकी, रेडिओंचे स्फोट झाले होते. या लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकी हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. लेबनॉन पेजर आणि वॉकी-टॉकी हल्ल्याच्या घटनेतून आता इराणने धडा घेत इस्त्रायल अशा हल्ल्याचा देखील प्रयत्न करू शकतो, त्या पार्श्वभूमीवर इंटरनेटशी कनेक्टेड सर्व उपकरणांवर इराणने बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सायबर सुरक्षा कमांडने सरकारी अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षा पथकांसाठी इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइसेस वापरण्यास बंदी घातली आहे. तसेच अधिकाऱ्यांना अँटी ट्रॅकिंग डिव्हाईस वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.