Israel Iran Conflict Updates : इस्रायल-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट करत हवाई हल्ले केले, तर इराणने इस्रायलमधील काही शहरांना टार्गेट करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागले आहेत. या दोन्ही देशातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. इराण-इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला असतानाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
या मागचं कारण म्हणजे इस्रायल आणि इराणच्या संघर्षात खामेनी यांनी ‘विनाअट शरणगती’ पत्करावी असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यांचा हा इशारा खामेनी यांनी धुडकावून लावला. एवढंच नाही तर इस्रायलशी हातमिळवणी करत अमेरिकेने इराणवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेला कधीही न भरून निघणारं नुकसान सहन करावं लागणार असल्याचा इशाराच खामेनी यांनी दिला होता.
दरम्यान, इराकचे माजी नेते सद्दाम हुसैन यांच्याप्रमाणेच खामेनी यांची अवस्था होऊ शकते अशी धमकी इस्रायलने दिल्यामुळे अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या होऊ शकते म्हणून खामेनी यांनी बंकरमध्ये आश्रय घेतल्याचं बोललं जात आहे. तसेच अयातुल्ला खामेनी यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्यासाठी उत्तराधिकाऱ्यांची नावं जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
अयातुल्ला अली खामेनी यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्यासाठी उत्तराधिकाऱ्यांची नावं जाहीर केले असून त्या नावामधून त्यांच्या मुलाचं नाव गायब असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता अयातुल्ला खामेनी यांची ३ दशकांची राजवट संपणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच खामेनी यांनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांद्वारे संवाद साधणं देखील सोडलं असून आपल्या विश्वासू लोकांमार्फत संवाद साधत असल्याचंही समोर आलं आहे.
उत्तराधिकारी होण्यासाठी तीन जणांची नावे दिली?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इराण-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यानंतर आता एक मोठं पाऊल उचलत संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तीन वरिष्ठ धर्मगुरूंची नावं दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र, कोणते तीन नावं जाहीर करण्यात आले, याबाबत अद्याप सांगण्यात आलेलं नाही. वृत्तानुसार, खामेनी यांचे पुत्र मोज्तबा जे एक धर्मगुरू देखील आहेत. पण त्यांचं उत्तराधिकारींच्या यादीतून नाव वगळण्यात आलं आहे. दरम्यान, इराणी अधिकाऱ्यांचा हवाला देत वृत्तात म्हटलं आहे की खामेनी एका सुरक्षित भूमिगत बंकरमध्ये असून ते त्यांना देण्यात आलेल्या हत्येच्या धमकीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
खामेनी इराणचे सर्वोच्च नेते कसे झाले?
८६ वर्षीय अयातुल्ला अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. देशाचे परराष्ट्र धोरण असो की ऊर्जा धोरण यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार खामेनी यांच्याकडेच आहे. १९८९ मध्ये अयातोल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे स्वीकारली. जवळपास तीन दशकांपासून खामेनी हे इराणवर एकहाती वर्चस्व गाजवित आहेत. इराणमधील एक अख्खी पिढी त्यांच्या नेतृत्वाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाही करीत नाही. खामेनी हे इराणचे प्रमुख आहेतच, पण त्याचबरोबर ते इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कोअरचे (आयआरजीसी) कमांडर-इन-चीफही आहेत, या सर्व अधिकारांमुळे खामेनी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते आहेत.
‘धर्मगुरू ते शक्तिशाली नेता’
१९३९ मध्ये इराणच्या मशहद या शहरातील एका धार्मिक कुटुंबात खामेनी यांचा जन्म झाला. त्यांनी मशहदमधील मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घेतले आणि नंतर ते पुढील शिक्षणासाठी कोम शहरात गेले. १९६२ पासून खामेनी यांनी इराणचे तत्कालीन सम्राट मोहम्मद रझा पहलवी (शहा) यांच्या विरोधात राजकीय हालचाली सुरू केल्या. अयातुल्ला अली खामेनी यांना इराणच्या इस्लामी क्रांतीच्या आधी अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. १९६० च्या दशकात ते काही काळ देशाबाहेर हद्दपारही झाले होते, पण १९७९ च्या क्रांतीनंतर ते पुन्हा इराणमध्ये परतले. इराणच्या क्रांतीनंतर खामेनी यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आले.