Israel Iran Conflict Updates: इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याची परिस्थिती दिसून येत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरात हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा मृत्यू झाल्याचाही दावा केला जात आहे. तसेच इस्रायलकडून इराणमधील सातत्याने तेहरानला लक्ष्य केलं असून तेहरानमधील इराणच्या सरकारी टीव्ही मुख्यालयावरही हवाई हल्ले केले आहेत. एवढंच नाही तर इस्रायलने इराणमधील गॅस रिफायनरी आणि तेल डेपोंसह आदी महत्वाच्या भागांना लक्ष्य केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये जवळपास एका आठवड्यापासून क्षेपणास्त्रांचा हल्ला सुरु आहे. या तणावामुळे तेहरानमधील अनेक भागात स्फोट झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जी-७ शिखर परिषद अचानक सोडून ते अमेरिकेला रवाना झाले असून त्यांनी सर्व नागरिकांना तेहरानमधून तात्काळ बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इस्रायलने केलेल्या हल्यानंतर इराणमध्ये नेमकं काय घडामोडी घडल्या आहेत? इस्रायलच्या हल्ल्याचा इराणला नेमकं कसा फटका बसला? याविषयी काही प्रमुख मुद्दे जाणून घेऊयात.

इस्रायलच्या हल्यानंतर इराणमध्ये काय घडलं?

इस्रायलने केलेल्या हल्ल्यात चीफ ऑफ स्टाफ अली शादमानी हे ठार झाले आहेत. त्यामुळे इराणला काही दिवसांतच आपला दुसरा लष्करी कमांडर गमवावा लागला आहे. इस्रायली हल्ल्यात मारले गेलेले गुलाम अली रशीद यांच्या जागी शादमानी यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला होता. याबाबत आयडीएफने म्हटलं की, शादमानी यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) आणि इराणी सशस्त्र दलाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यांचा मृत्यू इराणच्या लष्करी नेतृत्वासाठी एक मोठा धक्का आहे.

तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याचं आवाहन

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पुष्टी केली की, तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव शहराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत भारतीय दूतावास तेथील भारतीयांच्या संपर्कात असून भारतीय रहिवाशांना तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की काही भारतीय नागरिकांना आर्मेनियाच्या सीमेवरून इराण सोडण्यास मदत करण्यात आली आहे.

इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा

इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्याची पुष्टी इस्रायली संरक्षण दलांनी मंगळवारी केली. उत्तर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले होते, त्यानंतर तेथील रहिवाशांना आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर आयडीएफच्या संरक्षण यंत्रणेने अनेक क्षेपणास्त्रांना रोखलं.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा देत प्रत्येकांनी ताबडतोब तेहरान सोडण्याचं आवाहन केलं. तसेच इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही व इराणने अण्वस्त्रासंबंधित करारावर स्वाक्षरी न केल्याच्या कारणावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नाराजी व्यक्त केली. तसेच कॅनडाच्या जी ७ शिखर परिषदेतून डोनाल्ड ट्रम्प अचानक अमेरिकेला परतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

हजारो लोकांनी तेहरान सोडलं?

इस्रायलच्या लष्कराने सोमवारी मध्य तेहरानमधील लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा दिला. तसेच इस्रायलच्या लष्कराने इराणचे सरकारी टीव्ही मुख्यालय, पोलीस इमारतीसह आदी भागांवर हल्ले केले. त्यामुळे सुमारे ९.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या तेहरान शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. तसेच इस्रायलने रिफायनरीज आणि इंधन डेपोसह महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यानंतर पेट्रोल पंपांवर लांब रांगा लावल्याचंही वृत्त समोर आलं आहे.

चीनचंही नागरिकांना इस्रायल सोडण्याचं आवाहन

इस्रायलमधील चीनच्या दूतावासाने आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर इस्रायल सोडण्याचं आवाहन केलं. एका निवेदनात दूतावासाने चिनी नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेची हमी देऊ शकतील या अटीवर सीमा ओलांडून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

मध्य पूर्वेतील विमानतळंही बंद

संपूर्ण प्रदेशात हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे हवाई प्रवास काही प्रमाणात ठप्प झाला आहे. इराणचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद आहे, तर इस्रायलने बेन गुरियन विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केलं आहे. इराक आणि लेबनॉनच्या काही भागांमधील विमानतळ बंद आहेत. याचाही फटका अनेक प्रवाशांना बसला आहे.

डोनाल्ड ट्रम्प अणु करारासाठी प्रयत्नशील

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष वाढल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अणु करारासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितलं की ट्रम्प अजूनही इराणशी अणु करारासाठी प्रयत्नशील आहेत. दोन्ही देशांत चर्चेने शांतता प्रस्तापित होऊ शकते, असं पीट हेगसेथ यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराणचंही ड्रोन हल्ल्यांनी प्रत्युत्तर

इस्रायलच्या हल्ल्याला आता इराणचंही प्रत्युत्तर अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. इस्लामिक रिपब्लिकने रात्री १०० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. ज्यामुळे शुक्रवारपासून आतापर्यंत डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या ३७० हून अधिक झाली आहे. इराणी अधिकाऱ्यांनी देशाचं मुख्य उत्पादन केंद्र असलेल्या साउथ पार्स गॅस कॉम्प्लेक्सवर तीन ड्रोन हल्ल्यांची पुष्टी केली.